

डॉ. दीपा उसुलुमार्टी
बरेच लोक आपले पांढरे केस लपविण्यासाठी तसेच तरुण दिसण्यासाठी रासायनिक घटकांचा समावेश असलेले केसांचे तयार रंग वापरतात. हे रंग कॉस्मेटिकद़ृष्ट्या फायदेशीर ठरत असले, तरी वारंवार आणि दीर्घकाळ वापरल्याने हे आरोग्यासंबंधित धोके निर्माण करू शकतात. बहुतेक केसांच्या कृत्रिम रंगांमध्ये पॅरा फेनिलेने डायमाईन (पीपीडी), अमोनिया, रेसोर्सिनॉल आणि लीड एसीटेटसारखी रसायने असतात. हे आपल्या टाळूद्वारे शरीरात शोषले जाऊ शकतात किंवा श्वासाद्वारे आत घेतले जातात. ते हळूहळू शरीरात जमा होतात आणि नंतर डिटॉक्सिफिकेशनमध्ये सहभागी असलेल्या अवयवांवर विशेषतः मूत्रपिंडांवर परिणाम करतात.
आपल्या मूत्रपिंडांचे मुख्य कार्य म्हणजे रक्त शुद्ध करणे आणि शरीरातील अतिरिक्त पाणी आणि कचरा (टाकाऊ पदार्थ) बाहेर टाकणे. केसांच्या रंगांमधील रसायनांच्या वारंवार संपर्कामुळे मूत्रपिंडावर अधिक भार येऊन त्यांना अधिक काम करण्यास भाग पाडले जाते, ज्यामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. कालांतराने यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढू शकतो.
काही व्यक्तींमध्ये पीपीडीमुळे त्वचेची अॅलर्जी आणि शरीरातील रंगपेशींना इजा होते. अमोनिया आणि रेसोर्सिनॉल आपल्या त्वचा आणि श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. काही हेअर डाय उत्पादनांमध्ये लेड एसीटेटचा वापर केला जातो त्याचा परिणाम अवयवांवर होतो. हे रंग परवडणारे आणि व्यापकपणे उपलब्ध असले तरी, त्याच्या दीर्घकालीन वापरामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पीपीडी, अमोनिया किंवा तत्सम घातक रसायने असलेले केसांचे रंग टाळा. अशावेळी प्लांट बेस किंवा हर्बल पर्याय निवडा आणि नेहमी त्यावरील लेबल तपासा. केसांना रंग करताना हँडग्लोव्हज वापरा आणि त्वचा कमीत कमी संपर्क येईल याचा प्रयत्न करा. हेअर डाय करणार्यांसाठी नियमित मूत्रपिंड कार्य तपासण्यासाठी विविध चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो.
योग्य जीवनशैली बाळगणे - आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळावे. फळे आणि भाज्यांनी समृद्ध आहाराचे सेवन करावे. सौंदर्यप्रसाधनांमध्ये अनावश्यक रासायनिक घटकांशी संपर्क टाळावा आणि मूत्रपिंडाच्या कार्याचे रक्षण करावे. तुमच्या डॉक्टरांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा व नियमित तपासणी करावी.
प्रत्येकाला आपण चांगले दिसावे असे वाटते; मात्र त्यासाठी आरोग्याशी तडजोड करू नये. मूत्रपिंडास होणारे नुकसान हे अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात आढळून येत नाही. वापरत असलेल्या उत्पादनांबद्दल जागरूक राहणे आणि त्याद़ृष्टीने सक्रिय पाऊल उचलणे हे महत्त्वाचेआहे.
त्वचा उजळविणार्या अनेक क्रीम्समध्ये पारा, हायड्रोक्विनोन किंवा स्टिरॉइडस् असतात, ज्यामुळे गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. विशेषतः पारा हा एक जड धातू आहे जो मूत्रपिंडात साचून राहतो, ज्यामुळे कालांतराने मूत्रपिंडाचे कार्य बिघडू शकते. या क्रीम्सचा वापर अनेकदा वैद्यकीय देखरेखीशिवाय करू नये.
दीर्घकालीन वापराने पार्याची विषबाधा होऊ शकते, ज्यामध्ये थकवा येणे, सूज किंवा लघवीमध्ये बदल यासारख्या मूत्रपिंडाचे नुकसान होणारी लक्षणे आढळून येतात. जर अशा क्रीम्स वारंवार वापरल्या गेल्या तर हा धोका आणखी वाढतो. म्हणून त्वचाविकार तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही क्रीम्स वापरू नका आणि सुरक्षित पर्यायांसाठी त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.