

सध्याच्या सोशल मीडिया युगात प्रत्येक दिवस नवीन ट्रेंड घेऊन येतो. काही ट्रेंड फक्त मनोरंजनापुरते असतात, तर काही थेट आरोग्यावर परिणाम करणारे असतात. अशाच एका ट्रेंडने सध्या चर्चेत स्थान मिळवले आहे ते म्हणजे, लीप शेव्हिंग अर्थात ओठ शेव्ह करणे.
एका व्हिडीओमध्ये एका तरुणीला स्वतःचे ओठ शेव्हिंग करताना पाहिले गेले आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला. ओठांच्या वरच्या भागावर म्हणजेच अपर लिप्सवर शेव करणे नवीन नाही. चेहर्यावर दिसणारे सूक्ष्म केस लपवण्यासाठी अनेक मुली फेस शेव करतात; मात्र थेट ओठांवर रेझर फिरवणे ही एक वेगळीच आणि धोकादायक पद्धत आहे. हा ट्रेंड फॉलो करणार्या मुलींचे म्हणणे आहे की, ओठ शेव केल्याने त्यांच्या त्वचेवरील डेड स्किन सेल्स निघून जातात आणि ओठ अधिक मऊ व आकर्षक दिसतात. काहींचा दावा असा आहे की, स्किन एक्सफोलिएशनमुळे लिपस्टिक जास्त चांगली बसते. परंतु, सौंदर्य मिळवण्याच्या या प्रयत्नामागे लपलेला धोका अनेकांना माहिती नसतो. वास्तविक थेट ओठांवर रेझर फिरवणे हा केवळ मूर्खपणा असून तो घातकही आहे.
ओठांची त्वचा ही चेहर्यावरील इतर भागांच्या तुलनेत खूपच पातळ आणि संवेदनशील असते. अशा नाजूक त्वचेवर रेझर फिरवल्यास त्वचा कापली जाऊ शकते. त्यातून रक्त येऊ शकते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय ओठ जखमी झाल्यास किंवा वारंवार रेझरचे घर्षण बसल्यास ते हळूहळू काळे पडू शकतात. अनेक जणी ओठ मऊ करण्यासाठी हा उपाय करत असल्या, तरी त्यामागे लपलेला सौंदर्याचा धोका मोठा आहे. डेड स्किन सेल्स काढण्यासाठी ओठांवर रेझर वापरण्याची अजिबात गरज नाही. यासाठी सुरक्षित घरगुती उपाय उपलब्ध आहेत. सामान्यतः अनेक मुली लिंबाचा रस ओठांवर चोळतात किंवा त्यावर कॉफी पावडर लावतात; मात्र लिंबू आम्लीय असल्याने तो ओठ कोरडे करतो आणि दीर्घकाळ वापरल्यास ते अधिक काळे पडू शकतात. सुरक्षित उपाय म्हणजे घरीच लिप स्क्रब तयार करणे.
ओठ काळे होण्यामागे आपल्याच काही सवयीही कारणीभूत असतात. वारंवार ओठ चाटणे किंवा जीभ लावणे, धूम्रपान करणे, बोटांनी ओठावरील त्वचा उपटणे अशा सवयींमुळे ओठांना नैसर्गिक रंग मिळत नाही आणि ते हळूहळू काळे पडतात. काही वेळा ही समस्या वैद्यकीय असते, ज्यासाठी तज्ज्ञांकडून केमिकल पील किंवा क्यू-स्विच लेझर यांसारखी क्लिनिकल ट्रीटमेंटस् घ्यावी लागतात. सौंदर्य मिळवण्याच्या नादात आरोग्याला धोका पोहोचवणे कधीही शहाणपणाचे नाही. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक ट्रेंड सुरक्षित असतोच असे नाही. म्हणूनच ओठ शेव्ह करण्याच्या धोकादायक ट्रेंडपासून दूर राहणे आणि त्वचाविशेषज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य स्किनकेअर पद्धती स्वीकारणे हा उत्तम उपाय आहे. सौंदर्य आणि आरोग्य यांचा समतोल राखणे हेच खरे स्मार्टनेसचे लक्षण आहे.