ठाणे : ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा परिसरात सुरू असलेल्या प्रस्तावित विकास योजनांमुळे स्थानिक कोळी समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या या गावठाणात झोपडपट्टी पुनर्विकास आणि क्लस्टर डेव्हलपमेंटसारख्या योजनांच्या नावाखाली मूळ रहिवाशांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप कोळी बांधवांकडून केला जात आहे.
चेंदणी कोळीवाडा हा ठाणे शहरातील मूळ कोळी समाजाचा पारंपरिक गावठाण परिसर आहे. मात्र महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत असलेले विस्तारित गावठाणाचे कायदेशीर हक्क आजही प्रत्यक्षात लागू झालेले नाहीत. परिणामी अनेक कुटुंबांना अतिक्रमणधारक ठरवले जात असून, त्यांच्या घरांवर अनिश्चिततेचे सावट आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार या गावठाण भागात झोपडपट्टी पुनर्विकास लागू होऊ शकत नाही. असे असतानाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय घटकांकडून दिशाभूल करणारी आश्वासने दिली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे समाजात संभ्रम, तणाव आहे.
सध्याच्या विकास आराखड्या- नुसार कोळीवाडा परिसरावर शहरातील इतर नागरी भागांप्रमाणेच नियम लागू केले जात आहेत. याचा थेट परिणाम घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी व मूलभूत विकासावर होत आहे. त्यामुळे कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली जाहीर करावी, अशी मागणी समन्वयक सचिन ठाणेकर यांनी केली आहे.
विस्तारित गावठाण भागातील अनेक पारंपरिक घरे सरसकट झोपडपट्टी म्हणून वर्गीकृत केली जात असल्याचा आरोप आहे. मालमत्ता पत्रक देण्याऐवजी पुनर्विकासाच्या नावाखाली विस्थापनाचा मार्ग मोकळा केला जात असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. नवी मुंबईतील कोळीवाड्यांप्रमाणेच चेंदणी कोळीवाड्यालाही न्याय असे समन्वयक आनंद कोळी यांनी सांगितले.