

मालाड: मढ येथील कोळीवाडा, डोंगरपाडा परिसरात १० जानेवारीच्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत एका नौकेसह मासेमारीचे साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत कोळी बांधवांचे सुमारे नऊ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
डोंगरपाडा येथे राहणारे मच्छिमार भोवान्या मंगल्या कोळी यांची २५ फूट लांबीची नौका १० तारखेच्या पहाटे अचानक पेटली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे नौकेसह त्यातील साहित्याचा कोळसा झाला. ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या आगीत केवळ भोवान्या कोळी यांचेच नव्हे, तर इतर मच्छिमारांचेही मोठे नुकसान झाले आहे. भोवान्या मंगल्या कोळी यांची नौका (६.५० लाख), जाळी (१ लाख) आणि इतर साहित्य (२५ हजार) - एकूण ७.७५ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. फ्रान्सिस पास्कोल कोळी यांची मासेमारीची जाळी जळाल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले तर सुरेश बुजी एरंगले यांचे मासेमारी साहित्याचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे कोळी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन हंगामाच्या काळात रोजीरोटीचे साधन नष्ट झाल्याने मच्छिमार हवालदिल झाले आहेत. स्थानिक कोळी नेते संतोष कोळी यांनी या घटनेचा पंचनामा करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, कोळीवाड्यातील साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.