ठाणे : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित ‘बिहार भवन’ प्रकल्पावरून ठाणे-मुंबई परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यंगचित्राच्या माध्यमातून या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवला आहे. ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने “भवन नाही, संदेश आहे” या मथळ्याखाली व्यंगचित्रातून सरकारच्या धोरणांवर थेट निशाणा साधला.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या याच जागेत सुमारे अडीच हजार गोदी कामगार गेली बारा वर्षे हक्काच्या घरासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असताना प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, तीच जमीन बिहार सरकारला बाजारभावापेक्षा कमी दरात देण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे. यामुळे स्थानिक मराठी माणसांमध्ये असंतोष वाढत असल्याचे चित्र आहे. मुंबई आणि आसपासच्या भागात वाढती लोकसंख्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि राहण्यासाठी घर उपलब्ध नाही. या समस्या गंभीर होत चालल्या असताना सरकारने स्थानिक नागरिकांच्या गरजांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. अन्यथा अशा निर्णयांमुळे सामाजिक व राजकीय तणाव वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला.
सरकारने प्रथम गोदी कामगारांना घरे उपलब्ध करून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतरच इतर प्रकल्पांचा विचार करावा, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे. दरम्यान, या व्यंगचित्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून आगामी काळात हा मुद्दा अधिकच गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या महत्त्वाच्या जागेवर सुमारे 314 कोटी रुपये खर्चून ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय हा स्थानिकांच्या हिताविरोधात असून केवळ बाहेरील मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. मुंबईत आजही सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य, निवारा आणि मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असताना अशा प्रकारचे प्रकल्प प्राधान्याने राबवणे अन्यायकारक आहे.स्वप्निल महिंद्रकर, अध्यक्ष, जनहित व विधी विभाग, ठाणे