Bhiwandi Mayor Election Pudhari
ठाणे

Bhiwandi Mayor Election: बहुमताआधीच भाजपात फूट! भिवंडीत महापौरपदावर दोन गट आमनेसामने

नारायण चौधरी विरुद्ध सुमित पाटील; 46 च्या बहुमताचा प्रश्न अद्याप अनुत्तरित

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडीत बहुमताचे गणित जमले नसतांना त्या आधिच भाजपमध्ये महापौरपदासाठी 2 गट पडले आहे. भाजप पक्षाकडून नारायण चौधरींची घोषणेनंतर हा वाद वाढला असून चौधरी भाजप सदस्य नसल्याचा महापौरपदाचे दावेदार सुमित पाटील यांनी आरोप केला आहे. बहुमतासाठी आवश्यक 46 ही नगरसेवकांची संख्या पार करण्यासाठी भाजपकडे 11 सदस्य कमी आहेत. अशा परिस्थितीत भाजप कोणत्या तत्वाने हे बहुमत मिळवणार, हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भिवंडी पालिका महापौरपदासाठी भाजपचे नारायण चौधरी यांचे नाव शहराध्यक्ष रवी सावंत यांना पत्राद्वारे कळविल्याने शहराध्यक्ष रवी सावंत यांनी महापौर पदासाठी नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, त्यांचे अभिनंदनाचे बॅनर समाजमाध्यमांवर झळकत शुभेच्छा सुरू असतानाच भाजपकडून महापौरपदासाठी इच्छुक असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील समर्थकांनी सुमित पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली असल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केले.त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये दोन गट पडल्याचे चित्र समोर आले आहे.

भिवंडी पालिकेत भाजपचे 22 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी 15 नगरसेवक माझ्या सोबत देव दर्शनाला बाहेर आहेत. त्यातच नारायण चौधरी हे निवडणुकी आधीच भाजपमध्ये दाखल झाले असून ते पक्षाचे अधिकृत सदस्य देखील नाहीत. तर भाजप नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा कशी करेल, अशी प्रतिक्रिया सुमित पाटील यांनी दिली असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पत्रावर जावक क्रमांक नसल्याने पत्राबाबत साशंकता व्यक्त केली आहे. लवकरच राज्यातील पक्षाचे सर्वोच्च नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या बाबत दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने अधिकृतपणे माझी नियुक्ती जाहीर केली असून त्या संदर्भातील लेखी पत्र देखील भाजप प्रदेश अध्यक्षांनी दिले आहे.त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी महापौर पदाच्या नावासाठी माझी अधिकृत घोषणा झाली आहे,अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक नारायण चौधरी यांनी दिली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी नारायण चौधरी व सुमित पाटील हे दोघे ही इच्छुक असल्याने या बाबत निर्णय घेण्याची विनंती शहर पदाधिकारी यांच्याकडून प्रदेश कार्यालयाकडे केली होती. भाजप प्रदेश कार्यालयाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणारे लेखी पत्र आमच्याकडे आले आहे.

बहुमताचे संख्याबळ कसे ?

भिवंडी पालिकेत भाजपाचे 22 शिवसेना शिंदे गटाचे 12 एक अपक्ष असे 35 चे संख्याबळ आहे. बहुमतासाठी आवश्यक 46 ही संख्या पार करण्यासाठी त्यांना 11 सदस्य कमी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT