बदलापूर : बदलापुरातील स्त्री बीज विक्री प्रकरणात मालती आयव्हीएफ सेंटरचा डॉक्टर अमोल पाटील याला बदलापूर पूर्व पोलिसांनी नाशिक येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी त्याला अटक केली असून बुधवारी चिखलोली येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बदलापूर स्त्री बीज विक्रीचं रॅकेट उघड झाल्यानंतर यात नाशिक येथील मुंबई नाका परिसरात असलेल्या मालती आयव्हीएफ आणि एआरटी सेंटरचा सहभाग असल्याचा पहिल्यांदाच तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले होते. नाशिक येथे असलेल्या परवान्याचा गैरवापर करत या डॉ.अमोल पाटीलने ठाणे येथेही आयव्हीएफचे एक सेंटर एका ब्लॉकमध्ये उघडून त्या ठिकाणी महिलांवर उपचार सुरू केले होते.
आणि त्या ठिकाणीच बदलापुरातील स्त्री बीज विक्रीच्या रॅकेटचे धागेदोरे पोलिसांना आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर हे धागेद्वारे नाशिकपर्यंत गेले. नाशिकच्या महापालिकेतील आरोग्य विभागाने यापूर्वी मालती आयव्हीएफ सेंटरला नोटीस दिली होती. कागदपत्रांमध्ये असलेल्या
अनियमितत्ता आणि यापूर्वी बदलापूर अटक झालेल्या आरोपींचे विविध गोष्टींद्वारे झालेल्या संभाषण आणि पुराव्याच्या आधारे डॉ.अमोल पाटील याला अटक करण्यात आली आहे. अमोल पाटील हा या प्रकरणात आरोप अटक झालेला पहिलाच डॉक्टर असून या प्रकरणात आणखीन काही आयव्हीएफ आणि एआरटी सेंटरवर कारवाई होते का, हे पहा महत्त्वाचं ठरणार आहे.