

बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात महिला शौचालयात जाण्यासाठी एका महिलेकडे सुट्टे पैसे नसल्याने तिला शौचालयाचा वापर करण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे त्या महिलेची गैरसोय झाली. हा संतापजनक प्रकार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी या विरोधात बदलापूर आरपीएफ पोलीस ठाण्यात ठाण मांडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपलं आंदोलन मागे घेतले.
विशेष बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून या शौचालयाच्या वापराचा ठेका संपला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाला रविवारी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देऊन प्रवासांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी विधानपरिषदेत बदलापूर रेल्वे स्थानकातील समस्यांचा मुद्दा मांडला होता. तसेच रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणी बद्दलही त्यांनी सभागृहाला माहिती दिली होती. रविवारी बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली तेव्हा या ठिकाणी असलेल्या शौचालयातून बेकायदेशीर पद्धतीने पाच रुपयांची वसुली करण्यात येत असल्याचा प्रकार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासमोर उघड झाला होता.
तेव्हा यापुढील काळात अशा प्रकारे पैसे वसूल केले जाणार नाहीत व हे पैसे वसूल करणे बेकायदेशीर असल्याचे माध्यमांच्या समोर सांगण्यात आले होते. मात्र 24 तास उलटत नाहीत तोवर पुन्हा सोमवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला अचानक भेट दिली. तेव्हा एका महिलेला लघुशंकेसाठी जाण्यासाठी पाच रुपये नाहीत म्हणून तिला शौचालय नाकारण्याचा प्रकार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी बोलावून घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
बदलापूर रेल्वे स्थानकात कोणताही करार नसताना पाच रुपये देत नाहीत म्हणून शौचालय नाकारल्यामुळे महिलेला गैरसोयीला सामोर जावे लागले. हा अत्यंत संतापजनक व मानवी मूल्यांचा ऱ्हास करणारा प्रकार आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य महिला आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोगाने घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बदलापुरातील रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.