ठाणे

डोंबिवली : कॉसमॉस बँकेला ६.३० कोटींचा चुना; नामांकित कंपन्यांसह बिल्डर्स लॉबीवर कारवाई

अमृता चौगुले

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याणमधील कॉसमॉस बँकेला दोन खासगी कंपन्यांसह बिल्डर्स लॉबी आणि 26 कर्जदारांनी संगनमत करुन 6 कोटी 30 लाख रुपयांचा बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद भिकाजी बेदाडे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जुलै 2021 पासून हे कर्ज मंजुरीचे प्रकरण सुरू असताना मे. कोरवी ॲग्रो, मे. क्रक्स रिस्क या कंपन्यांच्या संचालकांनी 26 कर्जदारांना कर्ज मिळून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या साह्याने बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. खळबळजनक बाब म्हणजे बँकेतून कर्ज मंजुरीतील मध्यस्थ उमेश भाईप, मे. कोरवी ॲग्रो प्रा. कंपनीचे संचालक कोकरे, मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंटचे संचालक आणि इतर 26 कर्जदार, श्री सिध्दीविनायक डेव्हलपर्स, श्री साईराज बिल्डर, साई सृष्टी बिल्डर, संस्कृती बिल्डर्स अशी बिल्डर्सची नावे आहेत.

मे. कोरवी ॲग्रो प्रा. लिमिटेड कंपनी स्थापन करुन संचालकांनी या कंपनीतील 26 कर्जदारांना कर्ज पाहिजे असा प्रस्ताव तयार केला. या कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ सल्लागार उमेश भाईप यांनी पुढाकार घेतला. 26 कर्जदारांच्या घरांच्या किंमती तत्कालीन शीघ्रगणक दरापेक्षा वाढवून त्या आधारे कर्जदारांच्या जुन्या सदनिकांचे पुनर्विक्रीचे बनावट विक्रीपत्र आरोपी यादीतील मे. सिध्दीविनायक डेव्हलपर्स, साईराज बिल्डर्स, साई सृष्टी बिल्डर्स, संस्कृती बिल्डर्स यांनी तयार करुन दिली.

कर्जदारांना कर्ज मंजूर करताना कागदपत्र आणि त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी कॉसमॉस बँकेने मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा. लिमिटेड या तिऱ्हाईत कंपनीची नियुक्ती केली. क्रिक्स कंपनीने कर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन वास्तवदर्शी अहवाल बँकेला देणे आवश्यक होते. तथापि बँकेची फसवणूक करण्याच्या इराद्याने एकत्र आलेल्या मे. कोरवी, मे. क्रक्स, विकासक आणि 26 कर्जदार यांनी संगनमत करुन कर्जासाठीची बनावट कागदपत्रे तयार करुन ती खरी आहेत असे बँकेला भासवून बँकेकडून 6 कोटी 30 लाख 17 हजार रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली.

बँकेची हप्तेफेड सुरू होताच कर्जदारांना हप्ते भरण्यास टाळाटाळ सुरू केली. बँकेने या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर कर्जदारांनी बनावट कागदपत्रे दाखल करुन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT