सोलापूर

Solapur fire news | टेंभुर्णीत भीषण आग; चार ते पाच दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

नऊ अग्निशमन बंबांच्या साहाय्याने ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण; सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

टेंभुर्णी: येथील करमाळा रोडवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण आगीची दुर्घटना घडली. या आगीमध्ये महेश हार्डवेअर, तोडकर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, विश्वकर्मा फर्निचर आणि माऊली फर्निचर व स्लायडिंग या ४-५ दुकानांना आगीने कवेत घेतले. यामध्ये दुकानांतील कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आग एवढी भीषण होती की बघता-बघता तिने रौद्ररूप धारण केले.

फर्निचरच्या दुकानातून उडाला भडका

मंगळवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास राजेंद्र लक्ष्मण बोंगाणे यांच्या बंद असलेल्या 'माऊली फर्निचर' दुकानाच्या मागील बाजूने अचानक धूर निघत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले. त्या ठिकाणी फर्निचरचा कचरा साठवला होता, ज्याने आधी पेट घेतला. स्थानिकांनी पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही मिनिटांतच आगीचा भडका उडाला. वाऱ्याच्या वेगामुळे आग शेजारील आकाश सुतार यांच्या 'विश्वकर्मा फर्निचर' दुकानात पसरली. काही तरुणांनी धाडस दाखवून शेजारील हार्डवेअरच्या छतावर चढून पाणी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

दोन मजली हार्डवेअर दुकान खाक

फर्निचर दुकानांनंतर आगीने महेश रामलिंग तोडकर यांचे 'महेश हार्डवेअर' आणि वैभव व अभिषेक तोडकर यांच्या 'इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक' दुकानाला विळखा घातला. महेश हार्डवेअर या दोन मजली दुकानात मोठ्या प्रमाणावर रबर, प्लास्टिक आणि फायबरचे साहित्य होते. या ज्वालाग्रही साहित्यामुळे आग अधिकच भडकली आणि सुमारे साडेतीन ते चार तास धगधगत राहिली. यात कोट्यवधींचे साहित्य जळून कोळसा झाले.

बालंबाल बचावले...

महेश हार्डवेअरच्या वरच्या मजल्यावर तोडकर कुटुंबीय वास्तव्यास होते. मात्र, आग लागली त्या वेळी सुदैवाने सर्व कुटुंबीय बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली.

९ अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले

आगीची भीषणता पाहता आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, विठ्ठल सहकारी साखर कारखाना, पांडुरंग सहकारी साखर कारखाना (श्रीपूर), माळीनगर शुगर, सोनई दूध संघ, इंदापूर नगर परिषद व औद्योगिक वसाहत आणि कुर्डुवाडी नगर परिषद अशा एकूण ९ ते १० ठिकाणच्या अग्निशमन बंबांनी रात्री ११ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. प्रचंड धूर आणि आगीच्या ज्वाळांमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. ही आग पाहण्यासाठी घटनास्थळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

नेत्यांनी घेतली धाव

घटनेची माहिती मिळताच आमदार अभिजीतआबा पाटील, रावसाहेब देशमुख, मधुकर देशमुख, भाऊ महाडिक, विलास देशमुख, संतोष पाटील, सुधीर पाटील, आप्पा हवालदार, गणेश केचे, शैलेश ओहळ आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासनाला सूचना करत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

टेंभुर्णीकरांचा संताप: 'इतकी मोठी लोकसंख्या, पण अग्निशमन यंत्रणा शून्य!'

या दुर्घटनेमुळे टेंभुर्णी शहरात सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ३० ते ३५ हजार लोकसंख्या आणि राज्यातील आघाडीची औद्योगिक वसाहत (MIDC) अशी ओळख असलेल्या टेंभुर्णी शहरात स्वतःची हक्काची अग्निशमन यंत्रणा नाही. हद्द म्हणजे, आग विझवण्यासाठी आलेल्या बंबांमध्ये पुन्हा पाणी भरण्यासाठी शहरात कोणतीही सोय उपलब्ध नव्हती. त्यामुळे अग्निशमन बंबांना पुन्हा पाणी भरण्यासाठी त्यांच्या मूळ गावी जावे लागत होते. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच आगीने एवढे मोठे रूप धारण केले आणि व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT