

Naigaon Dongargaon Fire
नायगाव : “पळा पळा… डोंगराला आग लागली!” असा आक्रोश करत ग्रामस्थ घराबाहेर धावले आणि काही क्षणांतच डोंगरगाव परिसरात भीषण आग भडकली. गुरुवारी (दि. ३०) दुपारी कडक उन्हात सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत जलजीवन मिशनअंतर्गत ठेवलेले पाईप तसेच कडब्याचे ढीग पूर्णतः जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी पाण्याच्या बादल्या, माती आदींच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तीव्र उष्णता आणि वाऱ्यामुळे आगीने काही क्षणांतच भीषण रूप धारण केले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती देऊनही नगरपंचायतीची अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. “वेळीच मदत मिळाली असती, तर नुकसान टळले असते,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. भर बाजाराच्या दिवशी उशिरा प्रतिसाद मिळाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगीत जलजीवन योजनेअंतर्गत ठेवलेले पाईप जळाल्याने संबंधित कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कडब्याचे ढीग राख झाल्याने शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत—
अग्निशमन यंत्रणा वेळेत का पोहोचली नाही?
आपत्कालीन व्यवस्थापनात त्रुटी का आढळल्या?
जलजीवन योजनेचे साहित्य सुरक्षित का ठेवले गेले नाही?
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
नायगाव : तालुक्यातील कृष्णूर औद्योगिक वसाहतीत गुरुवारी रात्री एका गोदामाला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. काही तास धुमसणाऱ्या या आगीत भंगारासह इतर साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज पुन्हा अधोरेखित झाली असून आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.