सोलापूर

Solapur news: कामतीत मराठा आंदोलकांकडून पडळकरांचा ताफा अडवला; SEBC आणि कुणबी आरक्षणाला कायम पाठिंबा असल्याचे प्रतिपादन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली

पुढारी वृत्तसेवा

कामती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील कामती येथे शनिवारी (दि. 5) मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर-रत्नागिरी महामार्गावरील कामती पुलाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा आंदोलकांनी अडवला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असताना त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कामती येथे मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा आंदोलनाच्या ठिकाणी आल्याचे निदर्शनास येताच आंदोलकांनी ताफा अडवून पडळकर यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

‘SEBC आणि कुणबी आरक्षणाला कायम पाठिंबा’

आंदोलकांच्या मागणीनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. “मराठा समाजाच्या SEBC आणि कुणबी आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा आहे,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. मात्र, कुणबी आरक्षणाच्या संदर्भात कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून तयार करण्यात आलेले कुणबी दाखले रद्दच होणार असल्याचेही पडळकर यांनी स्पष्ट केले. पडळकर यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत

रास्ता रोको आंदोलनामुळे सोलापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी परिस्थितीवर लक्ष ठेवत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT