

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सोनके तलावात नीरा उजवा कालव्यातून गुरुवारी ५० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत तलाव ७५ टक्के भरून घेण्यात येईल. तसेच लाभक्षेत्रात पाऊस झाल्यानंतर तो १०० टक्के भरला जाईल, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना दिले. यामुळे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण गुरूवारी मागे घेण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील सोनके, पळशी, गादेगाव, वाखरी, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, खेड भाळवणी, कौठाळी आदी नऊ गावांसाठी महत्त्वाचा असणारा तिसंगी-सोनके तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी ३१ ऑगस्टपासून तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी नेते समाधान फाटे, दिगंबर वाघमारे, तानाजी गोफणे व संतोष गायकवाड हे तिसंगी इनलेट गेट येथे उपोषणास बसले होते.
दरवेळी नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर व वीर धरण १०० टक्के भरल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील तिसंगी-सोनके तलाव भरून घेतला जातो. यंदा मात्र गेल्या दीड महिन्यांपासून कालवा सुरू असतानाही तलावात पाणी सोडण्यात आलेले नव्हते. यासंदर्भात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून दोन वेळा निवेदने देण्यात आली होती. पाठपुरावा सुरू होता. मात्र तरीही तलावात पाणी सोडण्यात आले नव्हते. त्यानंतर मात्र ३१ ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी पाण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आ. समाधान आवताडे, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांच्याशी फोनवरून चर्चा झालेली होती. गुरुवारी कार्यकारी अभियंता मोरे, उपविभागीय अभियंता राजेंद्र धोत्रे यांनी तलाव ७५ टक्के भरून घेण्याचे लेखी आश्वासन दिले.
यानंतर 'विठ्ठल'चे माजी चेअरमन भगीरथ भालके, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणव परिचारक, पंचायत समिती सभापती डॉ. शुभम आगावणे, पोलिस निरीक्षक रेखा घनवट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जगदंबा उद्योग समूहाचे संचालक संतोष बागल, तानाजी वाघमोडे, सहकार शिरोमणी कारखान्याचे व्हा. चेअरमन भारत कोळेकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनकर्ता शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.