सोलापूर

सोलापूर : शिवयोगी सिध्देश्वर महाराज अक्षता सोहळा उत्‍साहात

अमृता चौगुले

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : सत्यम्…सत्यम्… दिड्डम्… दिड्डम्…चा मंत्रोच्चार, 'शिवयोगी सिध्देश्वर महाराज की जय'चा नामघोष, आकाशाला गवसणी घालणारे मानाचे सात नंदीध्वज आणि बाराबंदीतील सेवेकरी यांच्यासह लाखो भाविकांच्या साक्षीने शिवयोगी सिध्देश्वर महाराजांचा अक्षता सोहळा शनिवारी दुपारी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती पंचपट्टीवर पार पडला.

900 वर्षापासून चालत आलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाची (काठी) प्रतीक असलेल्या नंदीध्वजाच्या अक्षता सोहळ्यास महाराष्ट्रासह, कर्नाटक राज्यातून भाविक येतात. शुक्रवारी सिद्धेश्वरांनी (सोन्नलगी) सोलापुरात स्थापन केलेल्या ६८ लिंगांना नंदी ध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक घालून रात्री उशीराने मानाचे सात नंदीध्वज उत्तर कसब्यातील वाड्यात विसावले. शनिवारी सकाळी ८ वाजता मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची पूजा हिरेहब्बू तर दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता वाड्यातून सजलेले सातही नंदीध्वज संस्कार भारतीने काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळीवरून अक्षता सोहळ्यासाठी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. या सातही नंदीध्वजांना फुलांचे मोठे हार व मोठे बाशिंग बांधण्यात आले होते.

मिरवणुकीपुढे समतेचा पंचाचार्यांचा पंचरंगी ध्वज नंतर सनई-चौघडा, हलग्यांचा दणदणाट सुरू होता. यावेळी नाशिक ढोलही सहभागी झाले होते.यावर्षी प्रथमच आंध्रातील नृत्यही मिरवणूक होते. मुख्य वाडा, दत्त चौक, दाते गणपती, माणिक चौक, विजापूर वेस यामार्गे दुपारी 2च्या सुमारास मानाचे सात नंदी ध्वज सम्मती कट्ट्याजवळ आले. विविवत पूजनाने सम्मती कट्ट्यावर अक्षता सोहळा पार पडला. त्यानंतर सिद्धेश्वरांच्या गदगीस अभिषेक करून विधिवत पूजा केली. त्यानंतर ६८ लिंग यांना नंदीध्वजांची प्रदक्षिणा झाली.

सुगडी पूजनानंतर अक्षता सोहळा सुरू 

अक्षता सोहळ्यापूर्वी सिद्धेश्वर तलावातील पाण्याने सुगडी (मडकी) धुवून घेण्यात येतात. गंगापूजन झाल्यावर या मडक्यात दही, चंदन, हळदी-कुंकू, बोरे व अन्य पदार्थ घेण्यात येतात. श्री सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या साक्षीने सर्व मानक-यांकडून संमती कट्ट्याजवळ सुगडीचे पूजन केले जाते. त्यानंतर कुंभार यांना विडा देण्यात येतो. यानंतर अक्षता सोहळ्यातील सम्मती वाचन होवून हा सोहळा पार पडला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT