

जळगाव : शाळेची फी न भरल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना कडाक्याच्या थंडीत शाळेच्या बाहेर बसवल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात घडला आहे. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जोपर्यंत फी भरणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिल्या जाणार नसल्याचे शाळा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला.
याबाबत संतप्त झालेल्या पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षण विभागाकडे याबाबत अहवाल मागवला आहे. याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, माझ्याकडे तक्रार आली होती. काही विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर थंडीत बसविण्यात आले. शिक्षण विभागाकडून याचा अहवाल मागितला आहे. कोणती समस्या आहे, याची शहानिशा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.