संतोष पवार
कासेगाव (द.सोलापूर) : जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे. यंदा पावसाचा मोठा खंड पडल्याने, ऐन वाढीच्या आणि शेंगा भरण्याच्या संवेदनशील अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याचा तीव्र ताण बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात दुष्काळाच्या झळा इतक्या तीव्र झाल्या आहेत की, नाईलाजाने बळीराजाला आपल्याच उभ्या उडदाच्या पिकावर रोटर फिरवावा लागत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांची तीन महिन्यांची अफाट मेहनत डोळ्यांदेखत मातीमोल होत आहे.
यंदाच्या सुरुवातीच्या पावसावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीनसह विविध खरीप पिकांची पेरणी केली होती. प्रारंभी पिकांची वाढ समाधानकारक झाली; मात्र त्यानंतर पावसाने तब्बल महिन्याभराची उघडीप दिल्याने जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला. ऐन शेंगा भरण्याच्या काळातच निसर्गाने घात केल्याने उडदाच्या शेंगांमध्ये दाणे भरलेच नाहीत. बहुतांश शेंगा पोकळ राहिल्या असून, तीव्र उन्हामुळे दाणे काळवंडल्याने उत्पादनाची उरली-सुरली आशाही पूर्णपणे मावळली आहे.
"हा रोटर पिकावर नाही, आमच्या कष्टावर फिरतोय..."
आपली हताश व्यथा मांडताना कासेगाव येथील शेतकरी संभाजी गाजरे म्हणाले, “उडदाचे पीक अवघ्या ६५ दिवसांत हातात येत असल्याने शेतकरी त्याला प्रेमाने 'तात्पुरते सोने' मानतात. पण या कडक दुष्काळाने या सोन्याची माती केली. महागडे बी-बियाणे, औषध फवारणी, खते आणि खुरपणी असा सर्व जमापुंजीचा खर्च केला; शेंगाही लागल्या, पण पावसाअभावी आत दाणा भरलाच नाही. शेंगा आतून पोकळ आणि वरून काळ्या पडल्या. आज हा रोटर उडदाच्या पिकावर नाही, तर आमच्या तीन महिन्यांच्या घामावर आणि कष्टावर फिरतोय. निसर्गाची ही अवकृपा अशीच राहिली, तर पुढच्या वर्षी शेतात उडीद पिकवायला शेतकरीच शिल्लक राहणार नाही. एवढा नाईलाज झालाय की उभे पीक गाडण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.”
कासेगावसह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे वाळवंट झाले आहे. जिल्ह्यातील इतर भागांतही हीच बिकट परिस्थिती असून, उभे वाळणारे पीक डोळ्यांसमोर पाहायचे की नांगरून फेकून द्यायचे, अशा अत्यंत वेदनादायी आणि द्विधा मनःस्थितीत शेतकरी अडकला आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टी, यंदा कोरडा दुष्काळ!
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्या आर्थिक फटक्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, यंदा पावसाच्या प्रदीर्घ दडीने शेतकऱ्यांचे उरलेसुरले कंबरडेही मोडले आहे. कर्ज काढून बियाणे, खते, मशागत व मजुरीवर हजारो रुपये खर्च करून उभे केलेले पीक पाण्यासाठी तडफडून वाया गेले आहे.
शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे आक्रमक मागण्या:
तत्काळ कोरडा दुष्काळ: दक्षिण सोलापूर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात त्वरित 'कोरडा दुष्काळ' जाहीर करण्यात यावा.
सरसकट भरीव मदत: कोणत्याही जाचक अटी, नियम किंवा क्लिष्ट पंचनाम्यांचा ससेमिरा न लावता सर्व बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट भरीव आर्थिक मदत थेट खात्यावर जमा करावी.
विनाअट पीक विमा: पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई विनाअट मंजूर करावी.
रब्बीसाठी मोफत बियाणे: खरीप पूर्णपणे वाया गेल्याने आगामी रब्बी हंगामात शेतजमीन पडीक राहू नये म्हणून शासनाने मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा.