सराफी दुकान फोडले  
सोलापूर

सोलापूर : वळसंगमध्ये सराफी दुकान फोडले; ६६ तोळे सोन्याचे आणि २६ किलो चांदीचे दागिने लंपास

निलेश पोतदार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सोलापूर – अक्कलकोट रस्त्यावरील वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील पांडुरंग ज्वेलर्स हे सराफ व्यापाऱ्याचे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील रोख रक्कम ६६ तोळे सोन्याचे आणि २६ किलो चांदीचे दागिने असा एकूण ३७ लाख ८९ हजारांचा ऐवज पळविला. ही धाडसी चोरी (बुधवार) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वळसंग येथील डीसीसी बँकेजवळ सराफी दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे दुकानाचे मालक यशवंत महारुद्र चाकुर यांचे घर आहे. नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास यशवंत चाकूर यांनी दुकानाचे शटर लावून कुलूप लावून घरी गेले होते. बुधवारी पहाटे उठून चाकूर हे दुकानाजवळ साफसफाई करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना दुकानाचे चॅनेल गेट जवळ मोडलेले कुलूप आणि दुकानाच्या लोखंडी शटरचा कोयंडा तुटल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, ड्रॅाव्हरमधील 1 लाख रुपये तसेच शोकेसमध्ये लावलेले ६६० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच २६ किलो चांदीचे दागिने गायब झाल्याचे दिसून आले. हा प्रकार उपडकीस आल्यानंतर त्यांनी वळसंग पोलिसांना याबाबत माहिती दिली. या चोरीची फिर्याद दुकानाचे मालक यशवंत माचार (वय ५३ रा वळसंग) यांनी दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक अनिल सनगल्ले करीत आहेत.

चोरीत या दागिन्यांचा समावेश

चोरीस गेलेल्या ६६ तोळे सोन्याच्या दागिन्यांमध्ये मंगळसूत्र, अंगठ्या, लॉकेट, इयररिंग, मोरण्या, बोरमाळ, ठुशीहार, साखळी टॉप, बदाम मोरच्या पदक आणि लहान मुलांच्या अंगठया आदी. तर २६ किलो चांदीच्या दागिन्यांमध्ये ब्रेसलेट, हार, जोडवे, पैंजण आदीचा समावेश आहे.

पोलिसांनी सुरू केला तपास

पोलीस पथकातील श्वान दुकानाच्या पाठीमागील पाण्याच्या डबक्यापर्यंत जाऊन घुटमळत राहिला. पाण्याच्या डबक्यात रिकामे दागिन्याचे दुकानदाराचे आय कार्ड आणि इतर कागदपत्रे आढळली. ठसे तज्ञाच्या मते दुकानातील काचेवर ठसे आढळून आले. तसेच समोरीत एका दुकानाच्या सीसीटीव्हीत दोन चोरटे वावरत असल्याचे दिसून आले आहे.

अशी घडली चोरीचा घटना

मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सर्वप्रथम दुकानासमोर असलेले स्ट्रीटलाईटचे बल्ब फोडले. त्यानंतर दुकानासमोरील सीसीटीव्हीची वायर तोडली. चॅनेल गेटचे कुलूप त्यानंतर आतील लोखंडी शटरचा कोयंडा कटावणीने तोडून दुकानात प्रवेश केला. आणि रोख रकमेसहीत सर्व दागिने, ड्रॉव्हर मधील चेकबुक आदी इतर कागदपत्रे आदी गोणीत भरून पसार झाले. जाताना चोरांनी सीसीटीव्ही कॅमेराचा डीव्हीआर देखील सोबत नेला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणी

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अमर अधिक्षक हिमत जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी दामावर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक निंबाळकर, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल सनगल्ले आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी येऊन पाहणी केली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT