पुणे : झाडांची बेसुमार कत्तल, कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे निसर्गच धोक्यात आला असून, वाढती जमिनीची धूप, दूषित पाणी, हवेचे प्रदूषण ही मोठी आव्हाने मानवासमोर उभी राहिली आहेत. त्यासाठी भरपूर झाडे लावणे,पाण्याचे स्त्रोत जपणे हा पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक निसर्ग संवर्धन दिन 28 जुलैला साजरा केला जातो. सर्व नैसर्गिक संसाधने, वनस्पती आणि प्राणीप्रजाती, माती, पाणी आणि हवा यासह पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या दिनामागचा उद्देश आहे. निसर्ग सवंर्धन हा जनजागृती करण्याचा विषय आहे. बेसुमार वृक्षतोडीमुळे मातीची धूप वाढत आहे. शुद्ध पाणी कोठे आहे ते शोधावे लागते. जंगले नष्ट झाल्याने प्राणी नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे ग्लोबल वार्मिंगचा धोका वाढत आहे.
पृथ्वीचे रक्षण करा..
कचरा कमी करा, रसायने, कीटकनाशके कमी वापरा, पृथ्वीचे रक्षण करा असा संदेश निसर्गसंवर्धन दिनानिमित्त जगभरात फिरवला जात आहे. यंदाच्या निसर्ग संवर्धन दिनाची थीम 'वन उपजीविका, लोक आणि आपला ग्रह टिकवा' अशी आहे.
मातीची धूप वाढली आणि भूस्खलनही…
यंदा जगभरात उष्णतामान खूप वाढल्याची उदाहरणे आहेत. त्याचे मूळ जमिनीची वाढती धूप होण्यात आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. त्यांच्या मते, अमाप वृक्षतोड होत आहे.
नासाचा भारतावर शोधनिबंध..
अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था 'नासा' ने यंदाच्या उन्हाळ्यात भारत आणि पाकिस्तान या देशांच्या वाढत्या तापमानावर संशोधन प्रबंध सादर केला. त्यात म्हटले आहे की, भारत व पाकिस्तान हे देश एप्रिल व मे या दोन महिन्यांत खूप तापतात. तेथील शहरांचे वाळवंटीकरण, जमिनीची धूप यामुळे निसर्गाचे संवर्धन व संरक्षण करणे तातडीने करणे गरजेचे आहे. अन्यथा या दोन्ही देशांचे कमाल तापमान काही वर्षात 50 अंशांवर जाईल.
वाढत्या वृक्षतोडीमुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. त्याचा परिणाम मान्सूनवरही होत आहे. वाढती कीटकनाशके हाही मोठी धोका निसर्गासमोर आहे. त्यामुळे झाडे जगवणे, पाण्याचे स्त्रोत जगवणे ही कामे आपण केली नाही तर निसर्ग शिल्लक राहणार नाही. त्यासाठी शालेय जीवनापासून निसर्ग संवर्धनाचे महत्त्व शिकवणे हेच आपल्या हातात आहे.
-दिलीप यार्दी, पर्यावरणतज्ज्ञ
हेही वाचा :