Swami Samartha Mandir Akkalkot Pudhari
सोलापूर

Akkalkot Swami Samarth | श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ; अविरत अन्नदानाचे स्वामी कार्य

Akkalkot Swami Samarth | देवस्थानचे प. पू. श्री. मोहन पुजारी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या सहयोगाने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या धर्मादाय न्यासाची मुहूर्तमेढ रोवली.

पुढारी वृत्तसेवा

‘अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे, ज्ञान वैराग्य सिध्यर्थ भिक्षां देहिच पार्वती’ या श्लोकाची प्रचिती अन्नपूर्णेच्या रूपात देत, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्यावतीने अन्नदानाच्या या महायज्ञाचा विस्तार केला आहे. १९८८ पासून अतिशय पुण्याचे पण तेवढेच आव्हानात्मक व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम अक्कलकोट संस्थानच्या राजघराण्याच्या वारसा लाभलेले संस्थापक अध्यक्ष सन्मा. श्री. जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. श्री. जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष सन्मा.श्री. अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. आज बुधवार (दि. २९ जुलै) रोजी गुरुपौर्णिमा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त...

देवस्थानचे प. पू. श्री. मोहन पुजारी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या सहयोगाने, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या धर्मादाय न्यासाची मुहूर्तमेढ रोवली. अन्नछत्राच्या उभारणीवेळी संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर प्रथमतः ३ किलो तांदळाचा प्रसाद स्वामींना महानैवेद्य म्हणून दाखवला, भाविकांना महाप्रसाद दिला आणि अन्नछत्र मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. या धर्मादाय संस्थ्याची नोंदणी झाल्यानंतर, सार्वजनिक धर्मादाय त्यास अस्तित्वात आले.

कै. अंबाबाई सुरेशदेशमुख या मातोश्रींनी उदार अंतःकरणाने वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाद्वारालगत स्वतःच्या जागेत अन्नछत्र सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला अगदी लहान स्वरूपात हे कार्य सुरू होते. पण दिवसेंदिवस स्वामी भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, या धर्मादाय न्यासाने देवस्थानच्या दक्षिण बाजूस कै. वीरभद्र कोळळे यांच्या मालकीच्या जागेची रीतसर खरेदी करून, त्या जागेवर नियोजनपूर्वक मोठे पत्र्याचे शेड उभारून सन १९९४ मध्ये अन्नछत्र कार्याचा विस्तार केला.

सध्याचे अन्नछत्र हे प्रशस्त आणि वातानुकूलित आहे. अनेक स्वामी भक्तांनी या पुण्यकार्यात सढळ हस्ते देणग्या दिल्या. देणग्यांचा ओघही वाढला आणि आजही तो सुरू आहे. सुरुवातीच्या काळात एस.टी. महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने मदत करून या कार्यास हातभार लावला. तसेच सोलापूरचे कै. बाळासाहेब शिंदे व कै. शिवाजीराव पिसे महाराज यांनी या कार्यासाठी खंबीर साथ दिली. त्याचप्रमाणे ॲड. सुरेशचंद्र भोसले, पुणे आणि ॲड. नितीन हबीब यांनी या स्वामी कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत मोलाची साथ दिली.

स्वामी भक्तांचे व शहरवासी यांचे श्रद्धेय स्थान असलेल्या स्वामी विघ्नेश गणेशाची स्थापना १९९२ मध्ये 'रात्रीभोजन' समोर स्वामींच्या विशाल वृक्षाखाली करून सुंदर असे मंदिर त्याठिकाणी उभारलेले आहे. आजमितीस श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज दोन्ही वेळेस १५ ते २० हजारांवर स्वामीभक्त, महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्त होतात. उत्तम नियोजन, भक्तांच्या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन, महाप्रसादासाठी गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा व भाजीपाल्याचा वापर करण्याची दक्षता घेतली जाते. तसेच वॉटर सॉफटनरच्या माध्यमातून भक्तांना क्षाररहित व आर.ओ.चे पिण्याचे पाणी दिले जाते.

दररोज केळी जाणाऱ्या महाप्रसादात पोळी, मसालेभात, शिरा किंवा गव्हाची खीर, सांजा, आमटी, बटाटा-वांगी-काकडी भाजी, पालेभाज्या, पापड तर रात्री साध्याभात, पोळी, भाजी, आमटी असे प्रसादाचे स्वरूप असते. एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, दही, भगर, आमटी, खजूर, केळी असे उपवासाचे पदार्थ असतात. दररोज सकाळी ठीक ११.३० वाजता मंदिरात अतिथी व मान्यवर देणगीदारांच्या हस्ते स्वामींना महानैवेद्य दाखवून, अन्नछत्रात महाआरती व संकल्प पार पडतात. यानंतर सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जातो. येथे सुमारे ३०० शेतकरी असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालतो.

परगावच्या स्वामी भक्तांच्या निवासाच्या दृष्टीने यात्री निवास, यात्री भुवन, अतिथी निवास, गणेश मंदिर यात्री धांब व यात्रिनिवासा या निवासी इमारती बांधल्या असून यामध्ये स्वामी भक्तांना सोयी-सुविधा देऊ केल्या आहेत. यात्री निवास ही भव्य इमारत २००३ पासून स्वामी भक्तांच्या सेवेत रुजू झाली आहे.

या इमारतीमध्ये मिनी हॉलसह एकूण ६६ खोल्या असून १४ मोठे हॉल आहेत. पैकी दहा हॉलमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये सुमारे २००० भक्त निवासाला राहू शकतील इतकी क्षमता आहे. यात्री भुवन या इमारतीचे नोंदणी सुट आणि एसी सुट तसेच डीलक्स एसी सुट्स आहेत. सदर इमारतीत सुमारे ५०० भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे.

गणेश मंदिर यात्री धांब या इमारतीत एकूण बारा एसी सुट असून सुमारे ५० भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे. अतिथी निवास ही इमारतसुद्धा एसी असून येथेसुद्धा ५० भक्त विश्रांतीस राहू शकतील इतकी क्षमता आहे. त्याचप्रमाणे स्वतंत्र पलंग व्यवस्था सुरू असून याची क्षमता ६१ इतकी आहे. या सर्व इमारतीत लिफ्ट रॅम्प करण्यात आणून अतिथींना राहण्यासाठी सुसज्ज बसविलेली आहे.

सद्यस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या परिसरात प्रशस्त आणि भव्य असे ८ एकरातील वाहनतळ, वाहनतळ शेड तसेच २९० के.व्ही. क्षमतेचा सोलर प्रकल्प कार्यान्वित आहे. अन्नछत्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी स्वतः पुढाकार घेऊन सागवानी व उत्तम कलाकुसर केलेला असा स्वामींचा रथ केला असून हा रथ प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी वेळेस ७ दिवस पहाटे वेळेस शहरातून नगर प्रदक्षिणास निघत असतो.

महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास दर्शन घडवणारे शिव चरित्र, स्वातंत्र्य दर्शन भक्तांना पाहण्यासाठी उभारण्यात आले आहे. भारतरत्न गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी या न्यासाला लाभलेले आहे. 'गडकिल्ले सृष्टी' ही त्यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. अतिथी निवासाजवळ स्वामींची महती भक्तांना कळण्यासाठी श्री स्वामी समर्थ जीवन चरित्र भित्तीशिल्प साकारण्यात आले आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात सुशोभित आणि हिरवळीने नटलेल्या या आवारात श्री स्वामी समर्थ वाटिका व बालद्यान सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

न्यासाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रतिवर्षी 'गुरुपौर्णिमा' आणि 'वर्धन दिन' हा महोत्सव. या दहा दिवशीय धर्मसंकीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज प्रवचन-कीर्तनकार, गायक कलाकार आपली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करतात. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने, प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा परिक्रमा काढण्यात येते. परिच्छेद महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गोवा, कर्नाटक या राज्यातील स्वामी भक्तांना या माध्यमातून स्वामींच्या दर्शनाचा लाभ अन्नछत्र मंडळाच्या वतीने देण्यात येतो. १९९८ पासून ही पालखी परिक्रमा अखंडितपणे सुरू आहे.

२०१४ मध्ये उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये अन्नछत्र मंडळाच्या वतीने, गल्लेगल्ली येथील स्व-मालकीच्या विहिरीतून पाईप लाईनद्वारे पाणी आणून सलग बारा महिने दररोज १२ लाख ५० हजार लिटर पाणी अक्कलकोट नगर परिषदेस देण्यात आले.

सर्व सण, उत्सव व इलेक्शन ड्युटीस कार्यरत असणारे सर्व शासकीय कर्मचारी व पोलिस बांधवांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा न्यासाकडून केली जाते. राज्य परिवहन मंडळाच्या बाहेर गावातून मुक्कामी येणाऱ्या सुमारे ५० ते ६० बसेशच्या चालक व वाहकांना सुद्धा अद्यावत असे विश्रांती कक्ष व वातानुकूलित न्यासाकडून या परिसरामध्ये उपलब्ध करून दिले आहे.

वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन या महत् कार्यात सोलापूर-अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा, वडाची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यात आले. न्यासाच्या १९८८ पासून अविरत सेवेमुळे अक्कलकोट शहरातील व लगतच्या भागातील लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध झाला आहे.

ग्रंथ नामैस्तू पूज्यते सम्र्त तत्र देवता, या उक्तीला सार्थ करत, ऋषीऋणी प्रति आदर व्यक्त करण्यासाठी 'हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या' माध्यमातून हे त्यास उल्लेखनीय कार्य करीत आहे. हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था ही अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असून, ही संस्था सामाजिक बांधीलकी जपत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, नवरात्रीमध्ये तुळजाभवानी मंदिरात हजारो महिलांसमवेत कुंकुमार्चन, गणेशोत्सवात हजारो महिलांसमवेत गणेश अथर्वशीर्ष पठण आदी उपक्रम राबवित स्त्री सक्षमीकरणाचे एक आदर्श निर्माण केला आहे. या संस्थेच्या अध्यक्षा सौ. अलकाताई जनमेजयराजे भोसले या असून संस्थापक सचिका सौ. अर्पिताराजे अमोलराजे भोसले या आहेत.

श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी, स्वामी भक्तांचा स्वामींच्या रुपात मिळणारा आशीर्वाद आणि अन्नछत्रात अहोरात्र व अविरत परिश्रम करणारे, निःस्वार्थी वृत्तीने सेवा करणारे असंख्य सेवेकरी व कार्यकर्त्यांचे परिश्रम व विनम्रता यावरच अन्नछत्राची शून्यातून निर्मिती होऊन एवढ्या अथांग वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

मंगेशकर कुटुंबाशी ऋणानुबंध

भोसले घराण्याशी असलेले जुने ऋणानुबंध जपत भारतरत्न, गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी त्यांच्या व्यापाऱ्यात असलेली दोन वाहने भेट म्हणून दिली आहेत. न्यासाते मंडळाच्या परिसरामध्ये ती वाहने जतन करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात.

अक्कलकोट विकासासाठी योगदान

१९९३ च्या किल्लारीच्या भूकंपाच्या वेळेस या न्यासाने सलग एक महिना दररोज अन्नछत्र चालवले आहे. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत या न्यासाने अक्कलकोट शहर विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. स्मशानभूमीच्या जमिनीपैकी ४ १/२ एकर जागा मुस्लिम कब्रस्तानास, ३ एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी आणि ११/२ एकर जागा ब्राह्मण समाजास तसेच भक्तांच्या सोयीसाठी सुलभ शौचालयाकरिता मुस्लिम कब्रस्तानाजवळ स्मशानभूमीच्या जागा नगरपरिषदेस दिली आहे.

शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात योगदान

मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेविषयी आवड निर्माण होण्यासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी या न्यासाच्यावतीने भविष्यात चांगले योगदान असणार आहे. भविष्यात मराठी भाषा संवर्धनासाठी हे धर्मादाय न्यास असेच कार्य करणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यात हे न्यास देशी खेळास प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. तसेच अन्नछत्र मंडळ परिसरात भाविकांसाठी ध्यानधारणागृह व योग मंदिर त्याचप्रमाणे सांस्कृतिक भवन-मंगल कार्यालय उभारणार आहे.

घरपोच डबे, पैलवानांना खुराक

न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली दत्तजयंती २०२१ पासून 'समर्थ महाप्रसाद सेवा' सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अक्कलकोट शहरातील दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असलेल्या जवळपास २५० गरीब, गरजवंत व निराधार लोकांना दैनंदिन दोन वेळेचे जेवण, घरातून घरपोच करण्याचे कार्य, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे हे न्यास गेली दोन वर्षांपासून अक्कलकोट तालुक्यातील कुस्तीगीरांना दरमहा बदाम, काजू, अक्रोड, खारीक, खजूर तूप असा खुराक सुमारे ८६ कुस्तीगीरांना वाटप करीत आहे.

कोरोनात ५१,५०० लोकांना अन्नवाटप

कोरोना काळात यात्रीनिवास या निवासी इमारतीमध्ये शासनाचे कोविड सेंटर सुरू केले. येथील पॉझिटिव्ह रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, दोन वेळेचे जेवण देण्याचे कार्य केले आहे. कोविड सेंटरला स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार ५० बेड, ५० गाद्या, ५० उशा व बेडशिट्स देत व्यवस्था करण्यात आली. तसेच ससून हॉस्पिटल पुणे येथे व्हेंटिलेटर देऊ केले आहे. दररोज सुमारे १००० गरीब लोकांना तीन महिने सलग जेवण दिले.

पूरग्रस्तांना तातडीने मदत

न्यास भूकंपग्रस्त, चक्रीवादळ, पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात पुढे करते. तसेच गरीब व गरजूंना शैक्षणिक व वैद्यकीय मदत करते. ऑगस्ट २०१९ ला कोल्हापूर व सांगली तसेच डिसेंबर २०२१ ला चिपळूण येथील पूरग्रस्तांना कपडे, ब्लँकेट्स, औषधे आणि किराणा साहित्याचे वाटप केले.

२५ हजार जणांकडून रक्तसंकलन

आतापर्यंत प्रति महिन्याची पौर्णिमा व मंडळास साजरा केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उत्सवांसंगी २०१५ पासून सुमारे २५,००० पेक्षाही जास्त रक्तदानदात्यांकडून रक्त संकलन केले आणि खऱ्या अर्थाने रक्तदानाची चळवळ अक्कलकोट तालुक्यात रुजविली. तसेच स्वामी भक्तांसाठी अद्यावत वैद्यकीय सुविधांयुक्त ॲम्बुलन्स सेवा आणि फायर फायटर सेवा उपलब्ध केली आहे.

क्रिकेट ट्रेनिंग ॲकॅडमीची आज सुरुवात

अन्नछत्र मंडळातगत असलेल्या वाहनतळ जागेवर क्रिकेट शिकू इच्छिणाऱ्या मुला-मुलींसाठी 'अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग ॲकॅडमी' चे काम पूर्ण झाले असून न्यासाच्या ३५ वा वर्धापन दिन व श्री गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दि. २९ जुलै बुधवार रोजी उद्घाटन होणार आहे. तालुक्यातील कुस्तीगिरांना कुस्तीचे चांगले प्रशिक्षण मिळावे.

लवकरच वातानुकूलित महाप्रसादगृह

नियोजित ५ मजली महाप्रसादगृहाची इमारत ही भव्य आणि मंदिरसदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख ९१,३९८ चौरस फूट असणार आहे. इमारतीच्या टोकावर श्री स्वामी समर्थांची ७५ फुटांची सुंदर, देखणी आणि भव्य मूर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महाप्रसादगृहात एकाच वेळी सुमारे १५,००० पेक्षा जास्त स्वामीभक्त बसून महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT