Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विमानतळावर केली रुग्णाची विचारपूस

Pandharpur Ashadhi Wari Air Ambulance: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले.
Ashadhi Wari Air Ambulance
Ashadhi Wari Air Ambulancepudhari photo
Published on
Updated on

Pandharpur Ashadhi Wari Air Ambulance

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

छत्रपती संभाजीनगर येथील भाविक बाळू आसाराम पडूळ (वय ५४) हे दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पाठवले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा ईसीजी काढण्यात आला. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

दरम्यान, रुग्ण बाळू आसाराम पडूळ यांना एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूर विमानतळावर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून रुग्णाच्या उपचाराबत माहिती घेतली व आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते.

आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news