Ashadhi Wari : लाखो वैष्णवांच्या मांदियाळीत सोलापूर जिल्ह्यात तुकोबारायांचे आगमन

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन अकलूजच्या ‘समावि’च्या मैदानावर पहिले गोल रिंगण उत्साहात
Ashadhi Wari
लाखो वैष्णवांच्या मांदियाळीत सोलापूर जिल्ह्यात तुकोबारायांचे आगमन
Published on
Updated on

रवि शिरढोणे

अकलूज :

तुझा पाहुनी सोहळा । माझा रंगला अभंग॥

गेला शिणवटा सारा । मेघ झाले पांडुरंग ॥

नाम घेता तुकोबाचे । डौले पताका डौलात ॥

अश्व धावती रिंगणी । नाचे वीठू काळजात ॥

विठू नामाचा जयघोष करीत जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्या सोबत लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने सोमवारी (दि. २०) सकाळी ८.३० वाजता नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने रथावर पुष्पवष्टी केली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखी सोहळ्याचे तिसरे व जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण पार पडले. लाखो भाविकांनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

सकाळी पावणेदहाच्या सुमारास पालखी सोहळ्याचे अकलूज हद्दीतील गांधी चौकात आगमन झाले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, नंदिनीदेवी मोहिते -पाटील, माजी आ. रणजितसिंह मोहिते -पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, नगराध्यक्ष रेशमा अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील, मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी स्वागत केले.

गांधी चौकातून पालखी सोहळा विठ्ठल मंदिराकडे ग्रामप्रदक्षिणेसाठी गेला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सदुभाऊ चौकातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर पालखीचे आगमन झाले. पालखीची पाद्य पूजा, अश्वाचे पूजन संग्रामसिंह मोहिते-पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाली. यावेळी स्वरूपाराणी मोहिते -पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील उपस्थितीत होते. तर स्वारधारक अश्वाचे पूजन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमती पद्मजादेवी मोहिते-पाटील व धनश्री घुले-पाटील उपस्थित होते.

सकाळी ११ वाजता रिंगण सोहळ्यात पताकाधारकांनी तीन फेऱ्या धावत पूर्ण केल्या. नंतर तुळशीधारक व हंडेकरी महिला, वीणेकरी, टाळकरी वैष्णवांनी फेरी पूर्ण केली. त्यानंतर दोन्ही अश्विनी धावत रिंगणात पाच फेऱ्या पूर्ण केल्या. तसा भाविकांनी तुकोबारायाचा जयघोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news