Shinde–Raut Viral Video Ahead of BMC Elections: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. कायम एकमेकांवर टीकेचे बाण सोडणारे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात समोरासमोर आले. मात्र, यावेळी राजकीय कटुतेऐवजी सौजन्याचं चित्र पाहायला मिळालं.
कार्यक्रमाच्या ठिकाणी संजय राऊत समोर येताच एकनाथ शिंदे यांनी थेट नमस्कार केला. एवढंच नाही तर राऊत यांची तब्येत कशी आहे, याचीही आपुलकीने विचारपूस केली. काही क्षणांचा हा संवाद कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे महापालिका निवडणुकांसाठी आरोप-प्रत्यारोपांची धार वाढलेली असताना, दुसरीकडे अशा प्रकारचा सौजन्यपूर्ण क्षण पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. काही जण याला ‘राजकारणापलीकडचा माणुसकीचा क्षण’ म्हणत आहेत, तर काहीजण यामागे राजकीय संकेत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक छोट्या हालचालीकडे बारकाईने पाहिलं जात आहे. त्यामुळे हा व्हायरल व्हिडिओ केवळ औपचारिक भेट होता की आगामी राजकीय घडामोडींचा संकेत, यावर आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, सध्या तरी या व्हिडिओने तापलेल्या राजकीय वातावरणात क्षणभरासाठी का होईना, दिलासादायक चित्र दिसलं.