सातारा

सातारा : सातार्‍याच्या विकासासाठी 326 कोटी

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा नगरपलिकेत 2 लाख 90 हजार 76 रुपयांच्या शिलकीसह 2022-2023 या आर्थिक वर्षाचा 326 कोटी 47 लाख 53 लाख 93 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शुक्रवारी प्रशासकीय कार्यकारी समितीत सादर केला. कोणतीही करवाढ नसलेल्या या अंदाजपत्रकात शहरासह हद्दवाढ भागातील पायाभूत सुविधांसाठी तसेच अजिंक्यतारा किल्‍ला, चार भिंती अशा ऐतिहासिक वास्तूंसाठी केलेली भरीव तरतूद हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य राहिले. सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी हॉलमध्ये पार पडली. सभेच्या सुरुवातीस लेखापाल आरती नांगरे यांनी पालिकेच्या उत्पन्न व खर्चाच्या ठळक बाबी सांगत लेखाशीर्षाखाली विविध योजनांतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांसाठी केलेल्या तरतुदींची माहिती विभागप्रमुखांना दिली.

मुख्याधिकारी अभिजित बापट अर्थसंकल्प मांडताना म्हणाले, सातारा पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. हद्दवाढ भागात कर आकारणी सुरू केली जाणार असून, याठिकाणी पायाभूत सुविधांसाठी आतापर्यंत 8 कोटींच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले असून, अर्थसंकल्पात पुढील विकासकामांसाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हद्दवाढ भागातील कचरा संकलनासाठी ई निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. नगरपालिका अधिकारी व निवृत्ती वेतनधारकांना 7 वा वेतन आयोगाच्या दुसर्‍या हप्त्यापोटी नगरपालिका 1 कोटी देण्यास प्रयत्नशील असून या अर्थसंकल्पात 3 कोटींची तरतूद केली आहे. नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा संभाव्य खर्च विचारात घेवून सुमारे 1 कोटी 70 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, गटारे, दिवाबत्‍ती अशा मुलभूत सुविधांचा विकास व देखभाल दुरुस्तीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. महादरे येथील राखीव वनक्षेत्राला फुलपाखरु संवर्धन राखीव क्षेत्र दर्जा प्राप्‍त होण्यासाठी आलेल्या प्रस्तावास अनुसरुन महादरे तलाव सुशोभिकरण 50 लाख, चारभिंती, अजिंक्यतारा किल्‍ला व ऐतिहासिक वास्तूच्या संरक्षणासाठी 75 लाखांची तरतूद केली आहे. विविध योजनांसाठी शासनाकडून 54 कोटी 26 लाखांचे अनुदान प्राप्‍त झाले असून त्यामध्ये कास धरण प्रकल्पाचा समावेश आहे. शहरातील मोक्याच्या जागा सुशोभित करण्यात येणार आहेत.

नगरपालिका शाळांमधील मुलींसाठी सुकन्या समृध्दी योजना राबवण्यात येणार आहे. दाभोळकर पुरस्कार दोन वर्षांचे जाहीर केले. शहरात नवी वाचनालये व अभ्यासिका सुरु करण्याचा प्रयत्न आहे.माजी सैनिकांसाठी 1 कोटी तर दिव्यांगांसाठी 40 लाखांची तरतूद केली आहे. पाणीपुरवठ्यावरील अतिरिक्‍त विद्युत खर्च कमी करण्यासाठी 1.5 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. नगरपालिका हद्दवाढ भागामुळे कर्मचार्‍यांवरील ताण वाढलेला असतानाही नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करते. सर्व कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे अभिजीत बापट यांनी सांगितले. विकास कर निधीतून नगरपालिकेला सर्वाधिक कर मिळवून दिल्याबद्दल बापट यांनी शहर नियोजन विभागाचे कौतुक केले. यावेळी नगर अभियंता दिलीप चिद्रे, अंतर्गत लेखा परीक्षक कल्याणी भाटकर, स्थावर जिंदगी विभाग प्रमुख प्रणीता शेंडगे, विद्युत अभियंता महेश सावळकर, हिम्मत पाटील, सतीश साखरे, प्रशांत निकम, विश्‍वास गोसावी आदि उपस्थित होते.

सातारकरांना घरपट्टीत मिळणार 20 टक्के सवलत

मुख्याधिकारी अभिजित बापट म्हणाले, यावर्षीच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. नागरिकांना दिलासा देण्याच्याद‍ृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. नगरपालिकेकडून पर्यावरणपूरक सुविधांच्या वापराबाबत 20 टक्क्यांपर्यंत घरपट्टी सवलत देण्यात येणार आहे. या उपक्रमाचा सातारकरांनी लाभ घ्यावा.

सातार्‍यास 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

मुख्याधिकारी अभिजित बापट म्हणाले, नागरिकांना पाणीपुरवठाविषयक सोयीसुविधा पुरण्यासाठी अमृत 2 योजनेंतर्गत कास धरणाचे पाणी नैसर्गिक उताराचा वापर करून शहरास पाणीपुरवठा वाढविण्यासाठी एका प्रभागात 24 बाय 7 पाणीपुरवठा मीटरद्वारे केला जाणार आहे. भविष्यात संपूर्ण शहरात अशाच पाणी वितरण व्यवस्थेचा अवलंब करण्याचा प्रशासनाचा मानस असून, त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT