कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा! | पुढारी

कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे. या ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाल्याने यंदाचे वर्षे निवडणुकीच्या धामधुमीचेच ठरणार आहे. दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी ही प्रभाग रचना अंतिम करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत निवडणुका न झालेल्या 5 आणि जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होत असलेल्या गावांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर केली. या प्रभाग रचनेवर दि. 25 फेब—ुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.

दि. 15 मार्चपर्यंत प्रांताधिकार्‍यांकडे या हरकतींवर सुनावणी घेतली जाईल. सुनावणीनंतर दि. 21 मार्चपर्यंत हे सर्व प्रस्ताव प्रांताधिकारी अंतिम मान्यतेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करणार आहेत. यानंतर दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी या ग्रामपंचायतींचे सर्व प्रभाग अंतिम करणार आहेत. गटा-तटांच्या अस्तित्वासाठी ग्रामपंचायत निवडणुकांत मोठा सत्ता संघर्ष असतो. यामुळे निवडणुकीसाठी सोयीचा प्रभाग हा त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा भाग आहे.

यामुळेच प्रभाग रचनेकडे सार्‍यांचे लक्ष असते. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ती पाहण्यासाठी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आदी ठिकाणी इच्छुकांची गर्दी होती. जिल्ह्यातील गगनबावड्यातील 21, राधानगरीतील 67, भुदरगडमधील 45, आजर्‍यातील 37, हातकणंगलेतील 39, शिरोळमधील 17, शाहूवाडीतील 49, पन्हाळ्यातील 50, करवीरमधील 53, कागलमधील 27, गडहिंग्लजमधील 34 व चंदगडमधील 41 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

…अशी आहेत प्रमुख गावे

करवीर : वळिवडे, वसगडे, गांधीनगर, पाचगाव, उचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, कंदलगाव, गोकुळ शिरगाव, कणेरी, कणेरीवाडी, शिंगणापूर, परिते, मोरेवाडी, सांगरूळ, सडोली दुमाला, चुये, निगवे खालसा, वडणगे, भुये, चिखली, आंबेवाडी आदी.

पन्हाळा : कोलोली, कोतोली, पोर्ले, कुशिरे, यवलूज, पडळ, मरळी, घरपण, बहिरेवाडी, माले, जाखले, पणुत्रे, आसुर्ले, पोर्ले, मल्हारपेठ, गोठे, आकुर्डे आदी.

शाहूवाडी : बांबवडे, कडवे, भेडसगाव, उदगीर, निळे, येळाणे, सरूड, चरण, साळशी, डोणोली, करंजफेण आदी.

हातकणंगले : जुने, नवे पारगाव, घुणकी, तळसंदे, टोप, संभापूर, नरंदे, रूकडी, शिरोली पुलाची, नागाव, हेर्ले, चोकाक, पट्टणकोडोली, रेंदाळ, तारदाळ, यळगूड, इंगळी आदी.

शिरोळ : खिद्रापूर, अकिवाट, अर्जुनवाड, राजापूर, अब्दुललाट, टाकवडे, कवठेसार आदी.

गगनबावडा : कोदे, साळवण, तिसंगी, अणदूर, मणदूर, असळज आदी.

राधानगरी : धामोड, राशिवडे खुर्द, बुद्रुक, घोटवडे, कौलव, ठिकपुर्ली, चंद्रे, तिटवे, आकनूर, शिरगाव, तारळे खुर्द, राधानगरी, सोळांकूर आदी.

कागल : कसबा सांगाव, व्हनाळी, बाचणी, आणूर, चिमगाव, हमीदवाडा, बोळावी, नंद्याळ, करड्याळ, अर्जुनवाडा, पिंपळगाव, बेलेवाडी, हसूर आदी.

भुदरगड : मुदाळ, वाघापूर, कूर, मडिलगे खुर्द, बुद्रुक, शेणगाव, पुष्पनगर, मडूर, कडगाव, तांबाळे आदी.

आजरा : उत्तूर, करपेवाडी, खेडे, झुलपेवाडी, शेळप आदी. गडहिंग्लज : कडगाव, कौलगे, महागाव, नेसरी आदी.

चंदगड : गवसे, अडकूर, निट्टूर, राजगोळी खुर्द, हेरे आदी.

Back to top button