Satara News
आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, धैर्यशील कदम व इतर. Pudhari Photo
सातारा

टिपू सुलतानच्या तलवारीवर आक्षेप नाही मग वाघनखांवर का?

पुढारी वृत्तसेवा

सातारा : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजलखानाचा वध केला, या पराक्रमाची इतिहासात नोंद आहे. गणेशोत्सवात या प्रसंगावरील देखाव्यावर कुणी आक्षेप घेऊ नये. विजय मल्ल्याने इंग्लंडमधून टिपू सुलतानच्या तलवारीची खरेदी करून ती भारतात आणली. त्यावर कुठल्या इतिहासकार, इतिहासतज्ज्ञांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, छ. शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी इतिहास घडवला, त्याबाबत का शंका घेतल्या जातात? अशा शब्दांत आ. शिवेंद्रराजे भोसले पत्रकार परिषदेत गरजले. सातार्‍यात इंग्लंडहून 19 जुलैला शिवाजी महाराजांची वाघनखे दाखल होत आहेत. त्यानिमित्त आयोजित आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवासीउपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैयशील कदम प्रमुख उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात पहिल्यांदाच ऐतिहासिक वाघनखे येत आहेत. वाघनखांची संग्रहालयापर्यंत मिरवणूक निघायला हवी. त्यामुळे शिवप्रेमी, इतिहास तज्ज्ञ, सर्वसामान्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल. या ऐतिहासिक वस्तूचे पावित्र राखायला हवे. मिरवणुकीसारख्या कार्यक्रमामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. संग्रहालयात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मिरवणुकीत झांज पथक, स्वागत कमानी, भगवी कणाद, छ. शिवाजी महाराज पुतळा, विद्युत रोषणाई करता येईल असे त्यांनी सांगितले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाघनखांच्या मदतीने पराक्रम केला. छत्रपती शिवाजी संग्रहालयात सर्वांना ही वाघ नखे पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणारे नियोजन याची माहिती सर्वदूर पोहोचली पाहिजे. शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन मिळणार हे सर्वांचे भाग्य आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, सातार्‍यात ऐतिहासिक वाघनखे येणार असल्याने याचा प्रसार करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. संग्रहालयात नाणी, मुद्रा, हत्यारे आदी ऐतिहासिक ठेवा माहिती फलकासह प्रदर्शनामध्ये ठेवण्यात येणार आहे.

संग्रहालयात 30 ते 40 लोकांचीच क्षमता आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक क्षण सातारकर, इतिहासप्रेमींना पाहता यावा, यासाठी जिल्हा परिषद हॉल व शहरात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीनची सोय केली जाणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद बहुद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरू असेल. या कार्यक्रमात ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. या कार्यक्रमासाठी 700 लोकांना पास दिले जाणार आहेत. 20 जुलैपासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 यादरम्यान संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात येणार आहे. एकावेळी 200 लोकांना संग्रहालयात सोडण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असेल. त्यानंतर महिला बचत गट, शेतकर्‍यांना शासनाच्यावतीने संग्रहालय पाहण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर लोकांसाठी प्रत्येक दिवशी 30 स्लॉट तिकीट विक्रीनुसार उपलब्ध होतील. तिकीट ऑनलाईन किंवा ऑफलाईन उपलब्ध असतील. ही वाघ नखे 7 महिने सातार्‍यात राहणार आहेत. वाघ नखांची कडक सुरक्षा व्यवस्था असेल. त्यासाठी खाजगी एजन्सी शासनाने नियुक्त केली आहे. वाघ नखे सर्वांना पाहता येतील, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.

बैठकीनंतर आ. शिवेंद्रराजेंना पत्रकारांनी अफझलखान वधासंदर्भात काही सूचना करणार का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अफझल खान वध या ऐतिहासिक प्रसंगावरील देखाव्यावरून सांगलीत दंगल झाली होती. त्यामुळे बंदी आली होती. हा इतिहास लिहिला गेला असून तो सर्वांना माहित आहे. यावर कुणी आक्षेप घ्यायचे कारण नाही. स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रू सोबतची ती लढाई होती. लढाईत एकाचा मृत्यू अटळ असायचा. त्यामुळे याला कुणीच वेगळी किनार देऊ नये.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात येणारी वाघनखे खरी की खोटी हाही विषय आता काढला जाऊ लागला आहे. अशा शंका उपस्थित करणार्‍या लोकांना माझा सवाल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीने दुमत निर्माण होतील असे विषय का येतात? शिवजयंतीच्या तारीख असो किंवा आणखी काही. ब्रिटिश म्युझियममध्ये अनेक वर्षांपासून ही वाघनखे आहेत. इतकी वर्षे त्याठिकाणी असलेली वाघनखे खरी की खोटी हे आतापर्यंत कधी पुढे आलं नाही किंवा कुणीही बोलले नव्हते. आता वाघनखे भारतात, महाराष्ट्रात येणार म्हटले की ती खरी की खोटी हा विषय का निघतो? असा सवालही आ. शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला.

आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, ज्यावेळी विजय मल्ल्याने टिपू सुलतानची तलवार विकत घेऊन इंग्लंडहून भारतात आणली त्यावेळी टिपू सुलतानची तलवार खरी की खोटी होती हे कुणी विचारलं नाही. पण शिवाजी महाराजांची वाघनखे खरी की खोटी हा प्रश्न दुर्देवाने महाराष्ट्रात विचारला जातो, याचा खेद वाटतो. वाघनखे पाहण्याचे भाग्य लोकांना मिळत असून त्याचा त्यांना आनंद घेवू द्यावा, अशी विनंती इतिहासकार, इतिहास तज्ज्ञांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हत्याराने पराक्रम घडवला ते हत्यार पाहण्याची संधी आपल्याला मिळत आहे. याचा अभिमान वाटत असून राजकीय उद्देशाने वाघनखांवर प्रश्न उपस्थित करणे, त्याच्या खरेपणाबाबत संभ्रम निर्माण करणे थांबवावे, अशी विनंतीही आ. शिवेंद्रराजे यांनी केली.यावेळी अमोल मोहिते, जयवंत भोसले, फिरोज पठाण, संदीप साखरे, रवी माने, जयेंद्र चव्हाण, महेश जगताप, धनंजय जांभळे, शेखर मोरे- पाटील, श्रीकांत आंबेकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, भालचंद्र निकम, सुवर्णा पाटील, अ‍ॅड. अरूणा बंडगर, रेणू येळगावकर, प्रविण पाटील, अ‍ॅड.विक्रांत पवार, बाळासाहेब महामूलकर उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT