.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सातारा : झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील जमीन खरेदी प्रकरणात कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन झाल्याची स्पष्ट कबुली गुजरात येथील जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकार्यांसमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत झाडाणी जमीन खरेदीप्रकरणी काही कागदपत्रे वळवी व इतरांनी सादर केली असून म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली आहे. मात्र, यापूर्वीच जादा तारखा दिल्याने वेळ लावू नये, अशी मागणी तक्रारदार सुशांत मोरे यांनी केली आहे. याप्रकरणी दि. 29 जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे.
झाडाणी येथील जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पीयुष बोंगीरवार यांच्यासह आठ जणांना नोटीस काढली आहे. याप्रकरणी संबंधितांना तीनवेळा म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी तक्रारदार सुशांत मोरे व संबंधित जाबदार हजर होते. यावेळी चंद्रकांत वळवी यांनी जमीन खरेदी प्रकरणातील सात बारा उतारे व फेरफार सादर केले. उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली. म्हणणे सादर करण्यासाठी अखेरची संधी देत असल्याचे सांगत दि. 29 जुलैला कागदपत्रांनिशी हजर राहण्याचे सांगितले.
सुनावणीनंतर चंद्रकांत वळवी म्हणाले, व्यवहारात कमाल जमीन धारण कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही सुरू आहे. परंतु, इतर आरोपांबाबत शासन योग्य तो निर्णय घेईल. कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. सुनावणीला हजर राहावे लागत असले तरी सर्वसामान्यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागते. तसेच आम्हीही या प्रसंगाला सामोरे जावू, असे वळवींनी सांगितले.