जिहे-कठापूर योजनेद्वारे आंधळी धरणात आणलेले पाणी माणगंगा नदीत सोडताना आ. जयकुमार गोरे, सोनिया गोरे, अर्जुन काळे, संजय गांधी व इतर. Pudhari Photo
सातारा

कृष्णामाईच्या पाण्याने माणगंगा प्रवाही होणे हा ऐतिहासिक क्षण

आ. जयकुमार गोरे : मी माण-खटावला पाणी आणल्याने बारामतीकरांचा अपमान झालाय

पुढारी वृत्तसेवा

दहिवडी : पुढारी वृत्तसेवा

सीतामाईच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या माणगंगेला आज कृष्णामाई प्रवाहित करत आहे, हा आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण आहे. मी जनतेला दाखवलेले आणखी एक स्वप्न आज पूर्ण होत आहे. माणच्या उत्तर भागासाठी असलेली आंधळी उपसा योजनाही पूर्ण होत आहे. टेंभू योजनेद्वारे 42 गावांना पाणी मिळण्याची योजना मार्गी लागत आहे. उरमोडीचे पाणी गेली 10 वर्षे मतदारसंघात येत आहे. माझी पाण्याची लढाई अंतिम टप्प्यात आली असल्याचे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले. मी मतदारसंघात पाणी आणल्याने या भागात पाणी येणारच नाही, असे म्हणणार्‍या बारामतीकरांचा अपमान झालाय, असा टोलाही त्यांनी लगावला.

जिहे-कठापूर योजनेद्वारे आणलेले पाणी आंधळी धरणातून माणगंगा नदीत सोडण्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सोनिया गोरे, अर्जुन काळे, संजय गांधी, अतुल जाधव, सुनील पोरे, विजय सिन्हा, हरिभाऊ जगदाळे, सोमनाथ भोसले, सिद्धार्थ गुंडगे, गणेश सत्रे, दादासाहेब काळे, किसन सस्ते, अखिल काझी, विलासराव देशमुख, डी. एस. काळे, बाबासाहेब हुलगे, कृष्णा सिंचन विभाग कार्यकारी अभियंता प्रगती यादव उपस्थित होत्या.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, महाराष्ट्राला लुटण्याचे काम केलेले माणचे एक महान नेते पाणीप्रश्नावर अज्ञान पाजळताना आपल्या वाट्याचे पाणी आलेच नाही, असे म्हणतात. मात्र जयकुमारने माण-खटावच्या वाट्याचे आणि हक्काचे 11 टीएमसी पाणी उचलले आहेच, त्याचबरोबर फेर जलनियोजनातून टेंभूसाठी अडीच तर जिहे-कठापूर वाढीव आणि औंधसह 20 गावांसाठी प्रत्येकी सव्वा टीएमसी असे अतिरिक्त पाच टीएमसी पाणी मिळवले आहे. जिहे-कठापूरचे पाणी ऐन दुष्काळात आंधळी धरणात आणले. माणच्या उत्तर भागातील 32 गावांना हे पाणी आपण देतोय. उर्वरित गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून लवकरच सुप्रमा घेतोय.

42 गावांना टेंभूचे पाणी देण्याचा संकल्प

मायणी, कलेढोण, कुकुडवाडसह 42 गावांना टेंभूचे पाणी देण्याचा आपला संकल्प पूर्ण होतोय. औंधसह वीस गावांना पाणी देण्याच्या योजनेला मान्यता मिळतेय. हे सर्व गेल्या 15 वर्षातील संघर्षाचे आणि परिश्रमाचे फळ आहे. येणारी निवडणूक माझी पाणी प्रश्नावरील शेवटची निवडणूक असणार आहे. त्यानंतर माण- खटावला दुष्काळी संबोधण्याची कुणाची हिम्मत होणार नाही. आपण औद्योगिकीकरणाचा संघर्षही अंतिम टप्प्यात आणला आहे. म्हसवड परिसरात होणार्‍या औद्योगिक वसाहतीचा समावेश प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेत करणार आहे. 25 हजार रोजगार यातून उपलब्ध होणार आहेत.

जातीचे ना पातीचे, पाणी माझ्या मातीचे...

एक उद्दिष्ट पूर्ण झाले की मी नेहमी नवीन उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आलो आहे. मी मतदारसंघात पाणी आणताना प्रत्येक वेळी विरोधकांनी विरोधच केला आहे. पाणी आमची अस्मिता आहे. हे पाणी माझ्या माता भगिनी, शेतकरी बांधवांचे अश्रू पुसणारे आहे. मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे आहे. माण-खटावचा स्वाभिमान जागृत करणारे आहे. जातीचे ना पातीचे हे पाणी फक्त आणि फक्त माझ्या मातीचे आहे, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

माझा अपमान झालाय, पाणी आणणार्‍याला घरी बसवा

बारामती, फलटणकरांनी माण-खटावला पाणी येणार नाही, असे सांगितले होते. जयकुमारने मात्र दहा वर्षांपूर्वीच उरमोडीचे आणि आता जिहे-कठापूरचे पाणी आणून त्यांना चपराक दिली आहे. जयकुमारने 15 वर्षे संघर्ष करुन पाणीप्रश्न अंतिम टप्प्यात आणला आहे. त्यामुळे माझा अपमान झाला आहे. माझ्या अपमानाचा बदला घ्या. पाणी आणणार्‍या जयकुमारला घरी बसवा, असा फतवा बारामतीकरांनी काढला आहे. म्हणूनच विकासाचा इतर कुठलाही अजेंडा नसलेले त्यांचे चेलेचपाटे एक झाले असल्याचा टोला आ. गोरेंनी लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT