पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पहाटे 3 वाजल्यापासून पाऊस पडत आहे. दुपारी 12.30 वाजेपर्यंत येथे 168 मिमी पाऊस झाला असून, त्यानंतरही पाऊस सुरूच आहे. सोमवारनंतर जयपूरमध्ये मंगळवारीही हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
राजस्थानातील जयपूर शहरासह ग्रामीण भाग चौमुन, चाक्सू, दुडू, कोटपुतली, पावता, जामवरमगड, बस्सी, तुंगा, कलवारा यासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जयपूरच्या JLN रोडवर सर्वाधिक 135 मिमी पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी भरले होते, त्यामुळे तेथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याशिवाय रस्त्यावर इतके पाणी साचले की काही ठिकाणी दुचाकीस्वार बुडाल्याचे वृत्त आहे.
राजस्थानमध्ये पावसामुळे आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. काल भरतपूरमध्ये नदीत बुडून ७ मुलांचा मृत्यू झाला. यानंतर जयपूरच्या कनुता धरणातही ५ तरुण बुडाले. त्यांचे मृतदेहही रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्यात आले. हनुमानगडमध्येही कार कालव्यात पडून तिघांचा मृत्यू झाला. करौली येथे घर कोसळल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाला.
हवामान खात्याने सोमवारी जयपूर, भरतपूर आणि कोटा विभागातील काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की काही ठिकाणी अतिवृष्टी (200 मिमी पेक्षा जास्त) होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जयपूर, टोंक, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा, कोटा, वांद्रे, बुंदी जिल्ह्यांसाठी सोमवारी अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यावेळी राजस्थानमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसून येते. राजस्थानमध्ये पावसाळ्यात साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 283.9 मिमी पाऊस पडतो, मात्र यावेळी 397.8 मिमी पाऊस पडला असून तो सरासरीपेक्षा 40 टक्के जास्त आहे. पूर्व राजस्थानमध्ये 31 टक्के आणि पश्चिम राजस्थानमध्ये 56 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व आणि ईशान्य भारतात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आजच्या (दि.१२ ऑगस्ट) बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. पुढील आठवडा भरात पश्चिम आणि मध्य भारतात विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 आणि 13 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड तर 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान पूर्व मध्य प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.