नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील भूवैज्ञानिक अधिकारी व जिल्हा आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 42 गावात दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना या संदर्भात पत्र दिले असून, संबंधितांनी त्या त्या ग्रामपंचायतीचे लेखी कान टोचले आहेत.
जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य विभाग आणि भूवैज्ञानिक विभागाच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी पाणी नमुने तपासणी केली जाते.
ऑक्टोबर महिन्यात 14 तालुक्यांमधील 1728 पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यामध्ये नगर तालुक्यातील वाळूंज, जांब, बेलवाडी. कोपरगावमधील धोत्रे, लौकी, खिर्डी गणेश. पारनेर तालुक्यातील ढोकी, धोत्रे, ढवळपुरी, भांडगाव, जामगाव, दैठणे गुंजाळ. पाथर्डीतील कळसपिंपरी, जाटदेवळे, माळेवाडी, करोडी, एकनाथवाडी.
शेवगावमधील बालमटाकळी, सुकळी, रांजणी. राहाता ग्रामीण रुग्णालय आणि केलवड. राहुरी तालुक्यातील चिखलठाण, पिंपळगाव फुणगी, संक्रापूर, गणेगाव, कोल्हार खु, दवणगाव, बोधेगाव. संगमनेरची कुरण, खंदारमाळ, निमगाव, मिर्झापूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव अशा 42 गावांमधील 53 पाणी नमुने हे दूषित आढळले आहेत.
ग्रामपंचायतींना लेखी सूचना
नुकताच पावसाळा संपला आहे. पाण्याची भूजल पातळी उंचावली आहे. असे असताना ग्रामपंचायतीनेही शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या गावांमध्ये दूषित पाणी आढळले आहे, त्या त्या तालुक्यातील गटविकास अधिकार्यांना आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी लेखीपत्राव्दारे सूचना केल्या आहेत. संबंधित गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना नोटीसा बजावताना या संदर्भात उपाययोजना करून पुन्हा नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशा सूचना केल्या आहेत.