सातारा

शाळा बंदचा परिणाम : विद्यार्थ्यांचे मानोबल खचतेय..

अनुराधा कोरवी

सातारा : मीना शिंदे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शाळा महाविद्यालये सुरु राहिली पाहिजेत. शासनाने निर्बंध लागू करण्यापूर्वी लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करुन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केले जात होते. मात्र शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा ऑनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण होत आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवू लागला आहे.

कोरोना महामारीचे संकट देशासह राज्यावर गेल्या दोन वर्षांपासून घोंघावत आहे. या कालावधीत करण्यात आलेल्या लॉकडाऊन व निर्बंधामुळे सर्वसामान्य पूर्णत: कोलमडला गेला. शाळा व महाविद्यालये बंद झाली आणि ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जावू लागले. मात्र या शिक्षण पध्दतीचा ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द होत असल्याने विद्यार्थी वरच्या वर्गात जात आहे. परंतू त्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

ऑनलाईनमुळे अल्पवयीन मुलांसह सर्वांच्या हातात अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल आला. त्यामुळे त्याचा गैरवापर होवू लागला आहे. मुले मोबाईल अ‍ॅडीक्ट होवू लागली आहेत.टाईमपासच्या नावाखाली नकोत्या साईटला व्हिजीट दिल्या जात आहेत. त्यातूनच वाममार्ग चोखाळले जात आहेत.

इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची बँकींगपासून दैनंदिन कामे व गरजा पूर्ण होण्यासाठी इंटरनेटमुळे शक्य झाले असली तरी या नाण्याची दुसरी बाजूही आहे. सोशल साईटस्वर अभ्यासाचे व्हिडीओ पहात असताना नको त्या व्हिडीओ, लिंक व्हायरल होत असतात. सर्च न करतानाही त्याच्या जाहिराती येत असतात.

उत्सुकतेपोटी क्लिक केले जाते. त्यातून अल्पवयीन मुलांनाही अनावश्यक माहितीचे स्त्रोत निर्माण होत आहेत. याशिवाय युट्युबवर येणार्‍या पोर्नोग्राफी व अश्लील व्हिडीओच्या जाहिराती देखील स्मार्ट फोन वापरकर्त्यांच्या भावना चाळवण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्याचे पर्यवसन बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध व खून अशा घटनांमध्ये होत आहे.

मोबाईल अ‍ॅडिक्शनमुळे मुले एकलकोंडी होत आहेत. त्यांचा सामाजिक वावर कमी झाल्याने सामाजिक संस्कार कमी होत आहेत.काही विद्यार्थी शिक्षण प्रवाहाबाहेर पडत आहेत. वाममार्गाला गेलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असून पर्यायाने देशाचे भविष्य धोक्यात येणार आहे. कारण आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे त्यांची जडणघडण योग्य रितीने होणे काळाची गरज आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे काळाची पावले अडखळू लागली आहेत. मुलं ही पालकांची म्हातारपणाची काठी, आधार आहेत. हा आधार आताच ढळमळू लागल्यामुळे पालकांमध्ये चिंता वाढली आहे.

शासनाने शाळा, महाविद्यालये बंद न करता कोरोनाच्या नियमावलीची अंमलबजावणी करुन ज्ञानदान सुरु ठेवले पाहिजे. शिक्षक- विद्यार्थ्यांमध्ये समोरासमोर ज्ञानाची देवाण घेवाण झाल्यास गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन व जिल्हा प्रशासनाने समन्वयात्मक भूमिकेतून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकांमधून जोर धरु लागली
आहे.

कुशल मनुष्यबळाची कमतरता…

कोरोना काळात व्यावसायिक व तंत्रशिक्षणही ऑनलाईनच सुरु होते. आयटी आयसह काही व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमात 70 टक्के प्रात्यक्षिक व 30 टक्के थेरी असते. ऑनलाईन शिक्षणात या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणाचा अभाव असल्याने या विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर साशंकता निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षात डिग्री घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये डावलले जात आहे. त्यामुळे उद्योग विश्वाला कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

विद्यार्थ्यांना सोसावे लागतेय मानसिक द्वंद्व…

ऑनलाईन शिक्षणातील गोळाबेजरजेच्या गणितामुळे विद्यार्थ्यांना मानसिक द्वंद्वाचा सामना करावा लागत आहे. हा सामना करणे सर्व विद्यार्थ्यांना शक्य होईलच असे नाही. काही विद्यार्थी ऑनलाईन वर्गामुळे वेळेची बचत होत असल्याने अवांतर वाचन, छंद जोपासत आहेत. तर काही विद्यार्थी अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास करत असून काही वाममार्गाला जात आहेत. ऑफलाईन वर्गात अभ्यासू विद्यार्थ्यांचे कौतुक होते, त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळते. परंतू ऑनलाईन परीक्षेमुळे अभ्यासू व टंगळमंगळ करणारी मुलं एका श्रेणीत येत आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT