सातारा : कोर्टात ‘पोक्सो’त 10 दिवसांत शिक्षा | पुढारी

सातारा : कोर्टात ‘पोक्सो’त 10 दिवसांत शिक्षा

सातारा, विठ्ठल हेंद्रे : सातारा शहरालगत 2019 साली बाललैंगिक अत्याचाराची (पोक्सो) घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले असता न्यायालयीन प्रक्रियेत अवघ्या 10 दिवसांत आरोपीला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयांची तरतूद झाल्याने मुलीला व तिच्या कुटुंबीयांना न्याय लवकर मिळाल्याचे चित्र सातार्‍यात पाहायला मिळाले.

सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 11 डिसेंबर 2019 रोजी भर दुपारी संतोष चवरे (वय 35) हा आरोपी एका घरात शिरला. यावेळी 14 वर्षीय मुलगी झोपलेली असल्याचे पाहून नराधमाने तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे झोपलेली मुलगी घाबरून उठली व तिने बचावासाठी आरडाओरडा केला. आरोपी तेथून पळून गेला. घडलेल्या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली असता त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. स.पो.नि. डी. एस. वाळवेकर यांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीला अटक करून दोषारोपपत्र तयार करत ते सातारा न्यायालयात दाखल केले. ( शिक्षा )

सातारा जिल्हा न्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर त्यानुसार त्यावर क्रमांक पडणे, केस स्टँड होणे या प्रक्रिया सुरू झाल्या. अखेर प्रत्यक्ष या केसच्या कार्यवाहीला विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या कोर्टात सुरुवात झाली. सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांनी मांडली. सर्व प्रक्रिया जलदगतीने झाल्याने अवघ्या 10 दिवसांत त्याचा निकाल देण्यात आला. या केससाठी पोलिस हवालदार अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अजित फरांदे, वैभव पवार, पद्मिनी जायकर यांनी सहकार्य केले.

सेशन नंबर, चार्ज फे्रम, समन्स, निर्भीड जबानी, अन् रिझल्ट

‘पोक्सो’अंतर्गत गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर दीड वर्षापासून कोरोना संसर्गाने सातारा जिल्हा न्यायालयातही हाहाकार उडवला होता. दुसरीकडे मात्र या प्रकरणाची कार्यवाही तरीही सुरू होती. कोर्टात चार्जशीट दाखल झाल्यानंतर प्रथम त्यावर सेशन क्रमांक पडला. त्यानुसार ते पुढे न्यायाधीशांकडे प्रकरण गेले व चार्ज फ्रेम निश्चित करण्यात आला. यानंतर फिर्यादीसह केससंबंधी सर्वांना समन्स काढण्यात आले. साक्ष कमी लोकांची होती, तसेच या प्रकरणात फिर्यादी मुलीने निर्भीडपणे घडलेल्या सर्व घटनेची माहिती दिली. या सर्वांचा परिपाक शिक्षेचा ( शिक्षा ) रिझल्ट लागला.

विशेष कोर्ट, परिस्थितीजन्य पुरावा, साक्षीदार, पंच

अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यामुळे त्याची सुनावणी लवकर व्हावी, यासाठी सातारा जिल्हा न्यायालयात दोन विशेष कोर्ट आहेत. ते दोन्ही कोर्ट निवृत्त आहेत. मात्र, शासनाने त्यांची या केससाठी खास नियुक्ती केली आहे. या प्रकरणात फिर्यादी पीडित मुलगी, तिची आई, पंच व दोन साक्षीदार असे पाचजण होते. या सर्वाना समन्स पाठवून त्यांचा तत्काळ सरतपास, उलट तपास घेतला गेला. ही सर्व प्रकिया २० डिसेंबर २०२१ रोजी सुरू झाल्यानंतर ३१ डिसेंबर रोजी संपली व त्याच दिवशी न्यायाधीशांनी निकाल दिला.

हेही वाचलंत का? 

Back to top button