सातारा

पूररेषा आखणीचा मार्ग मोकळा, लिंगमळा धबधबा परिसरात अनाधिकृत बांधकामांवर टांगती तलवार

अनुराधा कोरवी

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा: महाबळेश्वरच्या वेण्णालेक ते लिंगमळा धबधबा परिसरातील वेण्णा नदीपात्रातील महत्तम पातळीचा अभ्यास करून दोन्ही तीरांवर निळी व लाल पूररेषा आखणीस मान्यता मिळाली असून या पूर नियंत्रण रेषेच्या आखणीनंतर वेण्णा नदीपात्रासह नदी तीरावरील अनाधिकृत बांधकामावर कारवाईची टांगती तलवार आहे.

मुख्याधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पल्लवी पाटील यांनी नदी पात्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणे गांभिर्याने घेतली होती. नदीपात्राची पूर नियंत्रण रेषा निश्चित करण्यासाठी पालिकेने सिंचन विभागाकडे रक्कम देखील भरली आहे. उच्चस्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत याबाबत विचारणा होत होती. पालिकेकडून पूर नियंत्रण रेषा आखणीबाबत सतत सिंचन विभागाकडे पाठपुरावाही करण्यात येत होता. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेस नुकताच कृष्णा सिंचन विभागाकडून पूर नियंत्रण रेषा निश्चितीबाबत आदेश प्राप्त झाला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, महाबळेश्वर शहर व परिसरातील वेण्णालेक ते लिंगमळा धबधबा परिसरातील वेण्णा नदीपात्रातील महत्तम पातळीचा अभ्यास करून दोन्ही निळी व लाल रेषा निश्चित करण्यात आली आहे. आता या पूर रेषांच्या आखणीबाबतचे प्रत्यक्ष नियोजन सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पूर रेषा निश्चितीनंतर पूर रेषेच्या आतील बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही नगरपरिषद व महसूल विभागाकडून होणे अपेक्षित असल्याचे अधिक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळाकडून पालिकेस आलेल्या पत्रात नमूद केले आहे. ही बांधकामे काढण्याची जबाबदारी प्राधान्याने नगरपरिषदेची राहील, असेही प्राप्त आदेशात म्हटले आहे.

दरम्यान वेण्णालेक ते लिंगमळा धबधबा परिसरात वेण्णानदी पात्रात व नदी तीरावर अनेक अनाधिकृत लॉजिंग, ढाबे, रेस्टॉरंट व बंगले असून पूर रेषा निश्चितीनंतर या अनाधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे.

सिंचन विभागाकडून पूर नियंत्रण रेषांच्या आखणीचे प्रत्यक्ष नियोजन सुरु आहे. ही आखणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
-पल्लवी पाटील

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT