एस टी च्या 55 हजार संपकरी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या | पुढारी

एस टी च्या 55 हजार संपकरी कर्मचार्‍यांना नोटीस बजावल्या

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एस टी महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी झालेल्या तब्बल 55 हजार कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यास महामंडळाने सुरुवात केली आहे.

एस.टी.त सुमारे 92 हजार कर्मचारी आहेत. त्यापैकी 24 हजार कर्मचारी कामावर आले आहेत. तर आजही सुमारे 55 हजार कर्मचारी संपात सहभागी आहेत. सतत 74 दिवस गैरहजर राहिलेल्या या कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यास सुरुवात केली आहे. तसे आदेश सर्व आगारप्रमुखांना देण्यात आले आहेत.

बडतर्फीची कारवाई सुरूच

महामंडळाने संपकरी कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई सुरूच ठेवली आहे. बुधवारी आणखी 189 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केलेल्यांची संख्या आता 1 हजार 333 झाली आहे. निलंबित कर्मचार्‍यांची संख्या 11 हजार 24 वर पोहोचली आहे. याशिवाय तीन हजार 79 कर्मचार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.

एस टी आंदोलनाला गर्दी

दरम्यान, कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे आझाद मैदानात बुधवारी आंदोलकांची गर्दी होती. महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले.

Back to top button