Jharkhand Accident : सिलिंडर नेणाऱ्या ट्रकची बसला धडक, झारखंडमधील भीषण अपघातात १७ जण ठार | पुढारी

Jharkhand Accident : सिलिंडर नेणाऱ्या ट्रकची बसला धडक, झारखंडमधील भीषण अपघातात १७ जण ठार

पाकूर; पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील पाकूर येथील अम्पाडा पोलीस स्टेशन हद्दीतील पडेरकोला गावाजवळ गुरूवार (दि. ०६) सकाळी गॅस सिलिंडर नेणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला धडक दिली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. (Jharkhand Accident)

झारखंडच्या पाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार विमल म्हणाले की, अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर दहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव ट्रक आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.

Jharkhand Accident : सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही

बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडकेची भीषणता अतिशय भयानक होती. मात्र सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. मृतांमध्ये बहुतांश बस प्रवासी आहेत. तर जखमी अवस्थेत असलेल्या लोकांचा स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास-पन्नास हजार रुपये पंतप्रधान मदत निधीतून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन ट्विट करत म्हणाले की, पाकूर ते लिट्टीपाडा-आमदापारा मार्गावरील अपघाताच्या हृदयद्रावक वृत्ताने अत्यंत दुःख झाले.

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असेही ते म्हणाले. सोरेन म्हणाले की, जखमींवर योग्य उपचार करण्याच्या योग्य त्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Back to top button