सातारा

सातारा : किल्ले वसंतगड बुरूजांचे दुर्गार्पण

स्वालिया न. शिकलगार

कराड : पुढारी वृत्तसेवा

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष व हजारो मावळ्यांच्या बलिदान, त्याग याचे जिवंत स्मारक असणार्‍या ऐतिहासिक किल्ले वसंतगडावरील नाईकबा दरवाजाजवळील बुरूंजाचे नुकतेच दुर्गार्पण झाले. राज्य पुरातत्व खात्याच्या निकषानुसार, ३५० वर्षानंतर चुन्याचा घाणा कार्यान्वित करत चुनखडीत हे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी परिश्रम घेणार्‍या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान व टीम वसंतगडच्या दुर्गसवेकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी…जय भवानी असा जयघोष करत जल्लोष केला.

अतिवृष्टी आणि ३५० वर्ष ऊन, वारा, पाऊस अंगावर घेणार्‍या ऐतिहासिक किल्ले वसंतगड येथील नाईकबा दरवाजाजवळील बुरूज ढासळला होता. किल्ले वसंतगड संवर्धनासाठी धडपडणार्‍या टीम वसंतगडने ही बाब सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गसेवकांच्या लक्षात आणून दिल्यानंतर या बुरूजांच्या पुनर्उभारणीसाठी या दोन्ही दुर्ग संवर्धन करणार्‍या संस्थांनी एकत्र येण्याचे निश्चित केले होते.

त्यानुसार मागील वर्षी जून महिन्यात राज्य पुरातत्व खात्याकडून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानला या बुरूजांची पुनर्उभारणी करण्याची मान्यता देण्यात आली होती. २४ जूनला अंत्यत साध्या पद्धतीने या कामाचा शुभारंभही करण्यात आला. त्यानंतर या बुरूजांच्या पुनर्उभारणीसाठी अपेक्षित असलेला साडेआठ लाखांचा खर्च पावसाळा संपल्यानंतर बुरूज संवर्धनासह पुनर्उभारणीच्या कामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली.

१४ डिसेंबरला या कामासाठी आवश्यक चुनखडी तयार करण्यासाठी गडावरील चुन्याचा घाणा कार्यान्वित करण्यात आला होता. त्यानंतर खर्‍या अर्थाने बुरूंजाच्या पुनर्उभारणीस गती आली. महिनाभरात हे काम पूर्णत्वास गेले. काम सुरू असताना आणि प्रत्यक्षात काम सुरू होण्यापूर्वी टीम वसंतगडच्या मावळ्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यास सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा जिल्ह्यातील दुर्गसवेकांनी सहकार्य केले.

बुरूजांचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर रविवार, १६ जानेवारीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित साधत या बुरूजांच्या कामाचे दुर्गार्पण करण्यात आले. प्रारंभी मोजक्या मान्यवरांसह दुर्गसेवकांच्या उपस्थितीत गडावरील चंद्रसेन मंदिरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दुर्गसेवकांच्या उपस्थितीत चंद्रसेन मंदिरापासून नाईकबा दरवाजाजवळील पुनर्उभारणी करण्यात आलेल्या बुरूंजापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली.

त्यानंतर कोरोना नियमांचे पालन करत भंडार्‍याची उधळण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय शिवाजी…जय भवानी असा जयघोष करण्यात आला. तसेच दुर्गसेवकांसह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून बुरूंजाचे दुर्गार्पण करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान ही दुर्ग संस्था राज्यभरातील दुर्ग संवर्धनासाठी नेहमीच अग्रेसर असते. दुर्ग संवर्धन कार्यास प्राधान्य देत आजवर सह्याद्री प्रतिष्ठानने किल्ले राजगड तसेच अन्य काही किल्ल्यांवर दुर्ग संवर्धनाचे मोठे कार्य केले आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT