जिल्ह्यात तेलबियांना चांगली मागणी असतानाही पेरणीत घट झाली आहे. सोयाबीनचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. सूर्यफूल क्षेत्र वाढत असताना भूईमुगाचे क्षेत्र घटले आहे. करडई, तीळ, जवस व कारळा ही पिके पारंपरिक पद्धतीनेच घेतली जात असून त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. तेलबिया पिके करताना येणार्या अडचणींमुळे शेतकर्यांमध्येही उदासीनता आढळून येत असल्याने तेलबिया पिकांच्या पेरणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
धान्य, कडधान्ये, नगदी पिकांप्रमाणेच तेलबियांचीही आवश्यकता असते. जिल्ह्यात तेलबियांना प्रचंड मागणी आहे. तेलबियांचे दरही वाढले आहेत. मात्र शेतकर्यांची उदासीनता असल्यामुळे तेलबिया लागवडीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तेलबियांसाठी लागणारा उत्पादन खर्च कमी आहे. मात्र सूर्यफूल सारखे पीक घेण्यास कुणी उत्सुक नसल्याने एखाद्या शेतकर्याने सूर्यफूल केल्यास हे पीक चिमण्या, पाखरे, पोपट असे पक्षी फस्त करतात. या पिकाचे क्षेत्र वाढण्यासाठी त्या भागातील शेतकर्यांनी आपापल्या शेतात सूर्यफूल पीक घेणे आवश्यक असते. मात्र शेतकरी एकत्र येत नसल्यामुळे सूर्यफूल शेतीचे प्रमाण नगण्य झाले आहे.
जिल्हा कृषी विभागाने या पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी यावर्षीपासून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बियाणे व बीजप्रक्रियेसाठी लागणारे औषधाचे मोफत वितरण केल्याने सूर्यफूल शेतीच्या पेरणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र भुईमूग, करडई, तीळ, जवस, कारळा या रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांचे पेरणी क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. करडई, तीळ, जवस व कारळा ही पिके ज्वारीत आंतरपिके म्हणून घेतली जातात. या पिकांचे स्वतंत्र उत्पादन घेतल्यास, या पिकांसाठी कृषी विभागाने क्लस्टर तयार केल्यास उत्पादन वाढून शेतकर्यांना पैसे मिळू शकतात. जिल्ह्यात बर्याच ठिकाणी कृषी क्षेत्राची संबंधित सूक्ष्म उद्योगांची निर्मिती होऊ लागली आहे. शेतकरी कंपन्या स्थापन होऊ लागल्या आहेत. या उद्योग-व्यवसायांमध्ये लाकडी घाण्यांची संख्या वाढू लागली असून त्यासाठी लागणारा हा कच्चा माल या तेलबियांचे उत्पादन वाढवल्यास जिल्ह्यातच मिळू शकेल. सध्या या लघु उद्योगासाठी लागणारा तेलबियांचा कच्चा माल सोलापूर, नगर आदी जिल्ह्यातून उपलब्ध करुन घ्यावा लागतो.
जिल्ह्यात तेलबियांमध्ये सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र याचा तेल घाण्यांसाठी फारसा उपयोग होत नाही. सोयाबीनपासून निघालेले तेल चवीला कडवट असते. त्यामुळे तेलघाणे सोयाबीन खरेदी करत नाहीत. अशा परिस्थितीत व्यापारी शेतकर्यांकडून खरेदी केलेले सोयाबीन मोठ मोठ्या कंपन्यांना विकतात. मात्र या कंपन्यांतून उत्पादित होणारे तेल आरोग्यास किती हितकारक असते हा संशोधनाचा विषय आहे. सातारा जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना इतर तेलबिया लागवडीकडे वळवणे आवश्यक आहे.
तेलबिया पिकाची पेरणी कमी होत असल्याने परिणामी उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असल्यामुळे त्याचा परिणाम तेलनिर्मितीवर झाला आहे. असे असतानाही उत्पादनाच्या तुलनेत तेलनिर्मिती जादा होत असल्याने तेलामध्ये पाम व इतर तेलांची भेसळ होत असल्याचे स्पष्ट आहे. राजरोसपणे हे प्रकार सुरू असल्याने भेसळीला चालना मिळत असल्याचे चित्र आहे.