

बिद्री : टी. एम. सरदेसाई
काळम्मावाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच काळम्मावाडी प्रकल्पातून दूधगंगा नदीत विसर्ग वाढविल्यामुळे पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे. त्यामुळे दूधगंगा नदीकाठ पुराने वेढला आहे. गेली दहा दिवस नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत, तर बिद्री येथील काही घरे पाण्यात गेली आहेत.
कागल तालुक्याच्या पश्चिम भागात तसेच धरण क्षेत्रात जोरदार पावसाचा धडाका सुरु आहे. बिद्री सर्कलमध्ये आज शुक्रवारपर्यंत ४५.०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज अखेर १४१७.८० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी यावेळी ८३८.७६ इतकी पर्जन्यवृष्टी झाली होती.
काळम्मावाडी धरण क्षेत्रात आज (शुक्रवार) चोवीस तासात ७९ मिलीमीटर पाऊस झाला. एकूण पाऊस २९२१ मिलीमीटर झाला आहे.
एकूण ६३२.०७८ पाणीसाठा दलघमी पाणीसाठा झाला असून, २२.३२ टीएमसी म्हणजे ८७.९० टक्के धरण भरले आहे.
धरणाच्या सांडव्यावरून ७६०० क्युसेक व वीजनिर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक असा ९१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात केला जात आहे. दिवसेंदिवस वाढता पाऊस व पाण्याचा विसर्ग यामुळे नदीकाठाला पुराचा वेढा अधिक घट्ट झाला आहे. पिके पाण्याखाली गेल्यामुळे ऊस पिकांच्या सुरळीत पाणी जावून पिके कुजण्याची व वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे तसेच संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आले आहे. यामुळे अनेक मार्गावर वाहतूक बंद झाली आहे. दूधगंगेवरील सुळंबी, तुरंबे, कसबा वाळवे, बाचणी, सिद्धनेर्ली धरणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे वहातुकीची मोठी कोंडी झाली आहे. तसेच बिद्री ते वाळवे खुर्द येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे बाचणी, कागलकडे जाणारी वहातूक कोलमडली आहे.
बोरवडे- मालवे रस्त्यावरही पाणी आले आहे. दूध वहातुकीची कोंडी होत आहे. बिद्री दूध चिलिंग सेंटरकडे पिराचीवाडी, सोनाळी मार्गे फेराट्याने वाहतूक करावी लागत आहे. जनजीवन ही विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालयातील उपस्थितीला मर्यादा येत आहेत. अनेक व्यवसायावर परिणाम झाला आहे. पूर वाढल्यामुळे अनेक गावच्या पाणी योजनांची जॅकवेल पुराच्या पाण्याखाली गेल्याने गावातील पाणी पुरवठा बंद आहे. बिद्री येथे पुराचे पाणी घरात शिरले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे, विजेचे खांब कोसळले असून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होत आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याचे चित्र आहे.
पुराच्या पाण्यामुळे दूधगंगेच्या दक्षिणेकडील गावांचा कोल्हापूरशी संपर्क तुटला आहे. दूध वाहतूक बिद्री चिलिंग सेंटरकडे वळवण्यात आली आहे. कागलकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी बिद्री पूल एकमेव मार्ग ठरला आहे.