सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा बँकेसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १४२ जणांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची आज मंगळवारी (दि.२६) सातारा जिल्हा बँकेच्या सभागृहात छाननी झाली. यामध्ये २१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले.
तर थकबाकीदार आणि संचालक असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दुपारी २ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर किती जणांचे अर्ज अवैध ठरले याचे चित्र स्पष्ट होईल.
मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी, उमेदवार, त्यांचे सूचक आणि अनुमोदक उपस्थित होते. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज माळी यांनी कोणत्या मतदारसंघातून कोणाचे अर्ज अवैध ठरले याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी थकबाकीदार आणि संचालक प्रमाणपत्र न जोडलेले अर्ज पेंडींग ठेवण्यात आले आहेत.
छाननीमध्ये सोसायटी मतदारसंघातून ११ अर्ज बाद झाले. तर इतर मतदारसंघाचे १० अर्ज बाद झाले. विकास सेवा सोसायटी, नागरी सहकारी बँक, महिला प्रतिनिधी आणि अनुसूचित जाती यामधील काही अर्ज पेंडिंग ठेवले आहेत. विमुक्त भटके जाती, जमातीमधून शिवाजीराव शेळके पाटील, महिला प्रतिनिधीमधून जयश्री मानकुमारे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : राजू शेट्टी – पवारांच्या त्या भिजलेल्या सभेनंतर शेतकरी ढेकूळ विरघळल्याप्रमाणे विरघळला