फलटण/वाखरी : पुढारी वृत्तसेवा: पुण्याच्या मटका किंगचा शिरवळ येथे झालेल्या मर्डर प्रकरणात किरण साळुंखे व तबरेज सुतार या दोघांकडून 2 पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, 7 मोबाईल, 11 मोबाईल बॅटर्या सापडल्या असून स्विफ्ट कारसह सुमारे 7 लाख 84 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पुणे भाजप माथाडी नेता अमोल हुलावळे याला कोर्टात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे.
मटका किंग संजय पाटोळे यांचा रविवारी शिरवळ येथील अपार्टमेंटच्या टेरेसवर गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक झाली आहे. खुनानंतर अवघ्या 12 तासांत सातारा एलसीबीने घटनेचा पर्दाफाश करत संशयित आरोपींना अटक केली. यातील पहिल्या चार संशयितांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. इतर दोघेजण फलटण येथे असल्याची माहिती समोर आल्यानंतर एलसीबीने फलटण पोलिसांना अलर्ट केले.
त्यानुसार पोलिसांनी फलटण शहरातील जिंती नाका, बारामती पूल, नाना पाटील चौक या ठिकाणी तत्काळ नाकाबंदी केली. दरम्यान, बारामती पूल येथील चेक पॉईंटवर संशयित स्विफ्ट गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी कार तेथे न थांबता पुढे दामटली. अखेर फलटण शहर पोलिसांनी पाठलाग करत रानडे पेट्रोल पंपाच्या समोर कार अडवून संशयित किरण साळुंखे व तबरेज सुतार यांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांकडे फलटण पोलिसांनी पाहणी केली असता पिस्टल, मोबाईल, मोबाईलच्या बॅटर्या, पैसे व कार होती. दोघांना नावाबाबत विचारले असता त्यांनी किरण बबन साळुंखे (वय 38, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे सध्या रा. फ्लॅट नं.501 लेक पॅलेस अपार्टमेंट, शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा) व तरबेज मेहबुब सुतार (वय 38, रा.ओम साई अपार्टमेंट, वरखडेनगर, कात्रज पुणे) असे सांगितले. संशयितांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हे संशयित मर्डर प्रकारणातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील तपास त्यांच्याकडे करण्यात आला.
हेही वाचलंत का?