नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आपापल्या शहरात परतत असून, नाशिकमधील सिद्धेश आनंद गायकवाड हा एमबीबीएसच्या दुसर्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थीही चार दिवसांच्या थरारक प्रवासानंतर नाशिकमध्ये परतला आहे.
सिद्धेश गायकवाड हा नाशिकमधील तिडके कॉलनीतील अनमोल नयनतारा सिटी 1 मधील रहिवासी असून, तो गेल्या दोन वर्षांपासून युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला आहे. मात्र, युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे सिद्धेश हा इतर मित्रांसमवेत नाशिक येथे आला असून, चार दिवसांच्या थरारक आणि जीवघेणा प्रवास करून परतल्याने त्याचे वडील आनंद गायकवाड व कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. युक्रेनमधील स्थितीबाबत बोलताना सिद्धेश म्हणाला की, युक्रेनची राजधानी कीवमध्ये अजूनही अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.
बहुतांश विद्यार्थ्यांनी बंकरमध्ये आश्रय घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. खारकिव्हमध्ये देखील अनेक जण अडकलेले आहेत. तेथून बाहेर पडताना जीवघेणे आहे. कारण सर्वच प्रकारची वाहने आणि बसेस बंद आहेत. कीव व इतर शहरांमध्ये सातत्याने बॉम्ब वर्षाव होत असल्याने प्रत्येक जण जीव मुठीत धरून आहे.