सांगली : बोगस दस्त करून फसवणूक करणार्‍यांना लोकांनी चोप देऊन सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. 
सांगली

सांगली क्राईम : सांगलीत बोगस दस्त करणार्‍यांना चोप

सोनाली जाधव

सांगली : पुढारी वृत्तसेवा
कवलापूर (ता. मिरज) येथील लाखो रुपये किमतीची 81 गुंठे जमिनीची बोगस दस्ताद्वारे विक्रीचा प्रयत्न करणार्‍या पाच जणांना गुरुवारी चांगलाच चोप देण्यात आला. त्यांना पकडून सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बोगस दस्त 

सलीम बाबू मुलाणी (वय 55, रा. बुवाची वठार, हातकणंगले), अक्षय अनिल शिंदे (वय 28, रा. यशवंतनगर, सांगली), राहुल काशीद गंगाधर (वय 38, रा. कुपवाड), विजय राजाराम माने (वय 29, रा. कुपवाड) व मनोज दशरथ निकम (वय 32, रा. इचलकरंजी)अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, निवृत्ती सीताराम हरगुडे ( रा. सांगलीवाडी) यांची कवलापूर हद्दीमध्ये 81 गुंठे जमीन आहे. या जमिनीचा खरेदी व्यवहार होणार होता. त्यासाठी संशयित आरोपींनी संगनमताने बनावट आधार कार्ड, ओळखपत्र व सातबारा उतारा तयार केला होता. हा दस्त नोंदवण्यासाठी त्यांनी सांगली येथील एका मुद्रांक विक्रेत्याकडे काम दिले होते. त्या मुद्रांक विक्रेत्याला या दस्तामध्ये व ओळखपत्रांमधील फोटोविषयी संशय आला. त्याने त्याच्या ओळखीचे असलेले व फिर्यादीचे मेहुणे असलेले राजाराम शंकर पाटील यांना संपर्क करून याबाबत कल्पना दिली.

राजाराम पाटील यांनी याबाबत मेहुणे निवृत्ती हरुगडे यांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर राजाराम पाटील, निवृत्ती हरुगडे व त्यांचे काही मित्र सांगली येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेले. तत्पूर्वी संबंधित मुद्रांक विक्रेत्यांनी त्याला काहीच कल्पना नाही असे दर्शवत तो दस्त नोंदविण्यासाठी नंबरमध्ये ठेवला होता. तो दस्त नोंदविण्यासाठी नंबर आला असता निबंधक कार्यालयातील शिपाई यांनी नाव पुकारले. जमीन देणार, घेणार, ओळख देणार, साक्षीदार या सर्वांची नावे पुकारली. नंतर दुय्यम निबंधक कार्यालयात प्रवेश करत असतानाच राजाराम पाटील, निवृत्ती हरुगडे व त्यांच्या साथीदारांनी या पाच जणांवर झडप टाकली व ओढत कार्यालयातून बाहेर आणले. त्या सर्वांनी मिळून या पाच जणांना चोप दिला. प्रसंगावधानाने काही जणांनी कार्यालयाच्या बाहेरील गेट लावले. हवालदार तावरे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्याला फोन करून घटनेची कल्पना दिली. काही वेळातच पोलिस आले.

हेही वाचलतं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT