सांगली

विटा : रेवण सिद्ध मंदिरावर प्रथमच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

अमृता चौगुले

विटा; पुढारी वृत्तसेवा : नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक असलेले श्री रेवणनाथ तथा रेवणसिद्धांच्या प्रकटदिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील रेणावी (ता. खानापूर) येथील प्राचीन मंदिरावर बुधवारी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

हिंदू धर्मातील नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी सातवे नाथ म्हणून रेवणनाथ परिचित आहेत. नवनाथ कथासार या धार्मिक ग्रंथामध्ये नवनाथांच्या अगाध लीलेचे वर्णन केलेले आहे. याचे तीर्थक्षेत्र सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी येथे आहे. हा भाविकांच्या भक्तीला सिद्ध होतो, म्हणून या ठिकाणास रेवणसिद्ध असे संबोधले जाते. तसेच, या ठिकाणी रेवण सिद्धांचे स्वयंभू स्थान आहे.

हे ठिकाण विटा शहरापासून पूर्वेस सात किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या रेणावी येथील श्री रेवणसिध्द देवाचा प्रगट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांसह हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होती.

कशी केली जाते पुजा

दरवर्षीप्रमाणे देवाची पालखी मंगळवारी १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता रेणावीतून शिखर शिंगणापूरकडे नेण्यात आली. त्‍यानंतर मंगळवारी सायंकाळी रेवणसिद्ध मंदिरात पालखी परत आली. तसेच बुधवार १६ मार्च रोजी श्री रेवणसिध्द देवाच्या प्रगट दिनानिमित्त पहाटे ३ ते ५ यावेळेत महापूजा आणि रुद्राभिषेक करण्यात आला. पहाटे ६ वाजता होमहवन त्‍यानंतर सकाळी ७.३० ते ८ या वेळेत आरती झाली. त्यानंतर हरिपाठ आणि धार्मिक विधींना सुरूवात झाली. दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी श्रींचा जन्मकाळ आणि महाआरती झाली. यावेळी रेणावी जिल्हा परिषद मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने बक्षीस वितरण करण्यात आले. दुपारी १२.३० पासून जालिंदर जाधव (मेंगाणवाडीकर) यांच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्‍यान, पहिल्यांदाच रेवण सिद्ध मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. रूद्रपशुपती कोळेकर महाराज आणि भाकणूक अय्या यांनी हेलिकॉप्टर मधून मंदिरावर पुष्पवृष्टी केली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT