सांगली: कडेगाव तालुक्यात पर्यटनाला चालना | पुढारी

सांगली: कडेगाव तालुक्यात पर्यटनाला चालना

सांगली पुढारी वृत्तसेवा : कडेगाव येथील ऐतिहासिक आणि पौराणिक डोंगराई मंदिर, सोनसळ येथील चौरंगीनाथ मंदिर व देवराष्ट्रे येथील सागरेश्वर देवालय व मानवनिर्मित अभयारण्य हे अनेक वर्षांपासून पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. याला पर्यटनाचा दर्जा प्राप्त झाला
आहे.

अर्थसंकल्पात कडेगाव व पलूस तालुक्यातील पर्यटनस्थळांसाठी 14 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटनस्थळांना चालना मिळणार असून विकासाच्या वाटा खुल्या होणार आहेत. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पर्यटन विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तेंव्हा अर्थसंकल्पात 14 कोटींचा निधी पर्यटन स्थळासाठी तरतूद झाल्याने या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

कडेगाव तालुक्यात सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध देवस्थान आहे. त्याचबरोबर चौरंगीनाथ मंदिर, लिंगेश्वर मंदिर, महादेव मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्यात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी व वनस्पती आढळतात.

सागरेश्वर अभयारण्य व चौरंगीनाथनंतर कडेपूर येथील डोंगराई देवी म्हणून कडेगावच्या दक्षिणेला उंच डोंगरावर मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे. वर्षातून तीन वेळा येथे यात्रा भरते. या ठिकाणीही विविध जातीचे पक्षी, वन्यप्राणी आणि औषधी वनस्पती आढळतात.

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील पर्यटन विकास खुंटला होता. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शासनाकडून मोठ्या निधीची अपेक्षा होती. दरम्यान, नुकत्याच अर्थसंकल्पात कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या प्रयत्नाने निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे.

Back to top button