सांगली : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेकडील गेल्या 15 वर्षांतील पाणी बिले, पाणी बिलाच्या डिमांड नोट आणि मोठ्या बिलांची थकबाकी यांचे ऑडिट केल्यास पाणीबिल घोटाळा 15 ते 20 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे नागरिक जागृती मंचचे आध्यक्ष सतीश साखळकर यांनी म्हटले आहे.
आयुक्त नितीन कापडणीस यांना साखळकर यांनी निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील भानगडींचा पसारा वाढत चालला आहे. नागरिकांकडून तक्रारी येत आहेत. नवीन कनेक्शन घेताना काही जणांना अर्ज विकत घ्यायला सांगितले, तर काहीजणांना मीटर तपासणी अहवाल आणण्यास सांगितले. काही कर्मचारी व त्यांच्याशी संगनमत असणारे प्लंबर यांच्यामार्फत कनेक्शन जोडून देण्यात आले. डिपॉझिट व जोडणी शुल्क ग्राहकांकडून घेतले. मात्र त्याच्या पावत्या न देता व पैसे महापालिकेमध्ये जमा न करता परस्पर वापरले. गेल्या 15 वर्षात दिलेल्या कनेक्शनचे डिपॉझिट व जोडणी शुल्क महापालिकेकडे जमा झाले का, याची चौकशी
करावी.