सांगली

सांगली : 30 लाखांच्या आमिषाने 74 लाखांचा गंडा

Shambhuraj Pachindre

सांगली : पुढारी वृत्तसेवा

येथील एका निवृत्त शिक्षकाला 73 लाख 95 हजार 797 रुपयांचा गंडा घालण्यात आला. 25 लाखांची लॉटरी लागल्याचे तसेच विना कागदपत्रे 5 लाखांचे कर्ज असे एकूण 30 लाख मिळणार असे आमिष त्यांना दाखविण्यात आले होते. याप्रकरणी किशोर दाभणे (वय 62, रा. दादा खताळनगर, कुपवाड रोड, वानलेसवाडी) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दाभणे यांना दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर एक मेसेज आला. त्यात 'तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे', असे सांगितले. त्यासाठी प्रक्रिया शुल्क, बारकोड शुल्क, पॅनकार्ड बदल शुल्क भरावे लागेल, असे सांगितले.

दाभणे यांचा यावर विश्वास बसावा यासाठी त्यांना दुसर्‍या व्यक्‍तींना लॉटरीचे पैसे मिळाल्याचे काही व्हिडीओही पाठविण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यावरून वेगवेगळ्या कारणाखाली संशयिताने सांगितल्याप्रमाणे 46 लाख रुपये संबंधिताला पाठविले. प्रत्येकवेळी वेगळे कारण संशयिताने सांगितले. ते यामध्ये इतके गुरफटत गेले की, 46 लाख रुपये देऊनही 25 लाखांच्या लॉटरीची रक्‍कम त्यांना मिळाली नव्हती.

कर्जाच्या आमिषाने फसवणूक

याचदरम्यान, त्यांनी एका अ‍ॅपवरून कर्जासाठी अर्ज केला होता. यावेळी त्यांना विना कागदपत्रे 5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले व ही रक्‍कम पूर्ण परत मिळणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे दि. 15 डिसेंबर ते दि. 31 डिसेंबर 2021 या कालावधीत त्यांनी 27 लाख 95 हजार 797 रूपये विविध खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने पाठविले.

पैसे भरून ही लॉटरी आणि कर्जही मंजूर झाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परंतु एकूण 30 लाखाच्या मोबदल्यात एका निवृत्त शिक्षकाने दोन पध्दतीने फसवणूक होऊन तब्बल 74 लाख 95 हजार 797 रुपये दिल्याने पोलिस देखील गोंधळात पडले आहेत.

वेगवेगळ्या 23 खात्यांवर पाठविली रक्‍कम

किशोर दाभणे यांच्याकडून संबंधितांनी पैसे घेताना केवळ एकाच बँक खात्याचा वापर न करता वेगवेगळ्या 23 बँक खात्यांचा वापर केला आहे. त्यामुळे तपास यंत्रणादेखील चक्रावली आहे.

SCROLL FOR NEXT