सांगली

रेल्वे अपडेट : महालक्ष्मी, कोयना, हुबळी एक्स्प्रेस रद्द

अमृता चौगुले

मिरज; पुढारी वृत्तसेवा : रेल्वेचे नवे अपडेट आले आहेत. मुसळधार पावसामुळे महालक्ष्मी, कोयना, हुबळी या तीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर कोकण रेल्वेमार्गे धावणार्‍या सहा एक्स्प्रेस गाड्या पुणे, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत देखील मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईतून सुटणार्‍या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री कोल्हापूरहून सुटलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री पुण्यातच थांबविण्यात आली. तेथून पुढे ती रद्द करण्यात आली. तर गुरुवारी मुंबईतून सुटणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

कोयना एक्स्प्रेसची जाणारी आणि येणारी अशा दोन्ही फेर्‍या रद्द करण्यात आल्या. बुधवारी सुटलेली हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस पुण्यात थांबविण्यात आली. तर गुरुवारी एलटीटी येथून सुटणारी हुबळी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. दादर येथून सुटणारी म्हैसूर एक्स्प्रेस पुण्यातून सोडण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे अपडेट : ६ एक्सप्रेस मिरज – पुणे मार्गे

कोकणमध्ये महापूर आला असून रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गे धावणारी निजामुद्दीन-एर्नाकुलम, एर्नाकुलम-ओखा, एलटीटी-तिरुअंतपूरम, हाफा-मडगाव, हिसार-कोईमतूर, वेरावल-तिरुअंतपूरम या एक्स्प्रेस गाड्या पुणे, मिरज मार्गे वळविण्यात आल्या आहेत.

चांदोली धरण : ४ हजार ८८३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवार सकाळी आठ ते आज गुरुवार सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज (दि. २२) सकाळी आठ ते दुपारी 4 वाजेपर्यंत आठ तासात 75 मिलिमीटर असा 32 तासात एकूण 260 मिलिमीटर पाऊस येथे बरसला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अतिवृष्टी कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी आज दुपारी तीन वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून 4 हजार 883 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.
वीज निर्मिती केंद्रातून 1125 कयु सेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण व वीजनिर्मिती असा दोन्ही मिळून सहा हजार आठ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.

गतवर्षी सहा ऑगस्ट रोजी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते यंदा 14 दिवस अगोदरच धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

हे देखिल वाचा : 

SCROLL FOR NEXT