सांगली

सांगली : विटा येथे ‘यशवंत’ कामगारांचा जिल्हा बँकेवर हलगी मोर्चा

अविनाश सुतार

विटा : पुढारी वृत्तसेवा : थकीत देणी त्वरित मिळावीत, या मागणीसाठी यशवंत साखर कामगारांनी विट्यातील जिल्हा बँकेच्या शाखेवर आज (दि.२७) 'हलगी मोर्चा' काढला. कामगार संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब यादव, सुखदेव कुंभार, आनंदराव नलवडे, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, शेकापचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड अॕड. सुभाष पाटील आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या एक हजाराहून अधिक कामगारांचे सन २००६ ते २०१२ या काळातील पगार, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि अन्य असे एकूण ८ कोटी २८ लाख ८६ हजार ७०१ रुपये आज अखेरीस सांगली जिल्हा बँकेने दिलेले नाहीत. या विरोधात कामगार गेल्या ५६ दिवसांपासून विट्यातील महसूल भवना समोर धरणे आंदोलन करीत आहेत. आज सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड येथील शाखेवर धडक हलगी मोर्चा काढला.

या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली. तेथून एसटी स्टँड मार्गे खानापूर रस्त्यावरील मार्केट यार्ड येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर हा मोर्चा नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून केला. कामगार संघटनेचे नेते भाऊसाहेब गायकवाड, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, सुखदेव कुंभार, आनंदराव नलवडे यांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक पापा मुल्ला यांना निवेदन दिले.

यावेळी भाऊसाहेब यादव यांनी सांगितले की, जिल्हा बँकेने आपली मागणी मान्य केली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेला आपण आवश्यक ते सहकार्य करायचे आहे. बँक प्रशासन थकीत देणी देण्यास तयार झाले आहे. हे आपल्या लढ्याचे यश आहे.

 'यशवंत'च्या आंदोलनात वयोवृद्ध कामगार व नातेवाईक सहभाही झाले होते. भरउन्हात हा मोर्चा काढला असल्याने यावेळी एका कर्मचाऱ्याल अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळला. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. त्याला तातडीने पाणी दिले. काही क्षणानंतर त्याला बरे वाटल्याने मंडपात नेऊन बसवले. या कर्मचाऱ्याचे नाव वाघमोडे असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT