सांगली: विट्यात ‘यशवंत’ च्या कामगारांनी उभारली काळी गुढी | पुढारी

सांगली: विट्यात 'यशवंत' च्या कामगारांनी उभारली काळी गुढी

विटा: पुढारी वृत्तसेवा : नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आज (दि.२२) गुढीपाडवा हा सण काळी गुढी उभारून आणि खर्डा भाकर खाऊन साजरा केला. या कामगारांच्या धरणे आंदोलनाचा आजचा ५१ वा दिवस आहे. तरीही जिल्हा बँकेने अद्याप या कामगारांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही.

खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या एक हजाराहून अधिक कामगारांचे सन २००६ ते २०१२ या काळातील पगार, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी आणि अन्य असे एकूण ८ कोटी २८ लाख ८६ हजार ७०१ रुपये आज अखेरीस दिलेले नाहीत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने आमचे पैसे तरी द्यावेत नाहीतर कारखान्याचा लिलाव तरी रद्द करावा अशी मागणी यशवंत च्या तत्कालीन कामगारांनी केली आहे. या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर १ फेब्रुवारीपासून लोकशाही मार्गाने आणि शांततेने धरणे आंदोलन सुरू आहे. आज विट्यातील तहसील कार्यालयासमोरील आंदोलन स्थळी या कामगारांनी काळी गुढी उभारली. तसेच खर्डा भाकरी आंदोलन केले.

यावेळी शेकपचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड अॕड. सुभाषबापू पाटील, अर्जुन लिमकर, कामगार नेते भाऊसाहेब यादव, संदीप ठोंबरे आदी उपस्थित होते. दरम्यान, येत्या २६ मार्चपर्यंत तोडगा न निघाल्यास येत्या २७ मार्चला सोमवारी विट्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेपर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा गायकवाड यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button