विटा; पुढारी वृत्तसेवा : यशवंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत ८ कोटी २८ लाख देण्याचा प्रश्न हा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि तुमच्या अंतर्गतला विषय आहे. त्यामुळे नियमानुसार उचित कार्यवाही करा अशी सूचना विट्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी जिल्हा उप निबंधकांना दिले आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.
विट्याच्या तहसील कार्यालयासमोर यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत देण्याबाबत धरणे आंदोलन सुरू आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वसुलीसाठी सन २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव केला आणि आपले कर्ज फेडून घेतले. त्या वेळी या लिलावातून मिळालेल्या पैशातून एक हजाराहून अधिक साखर कामगारांचे एकूण ८ कोटी २८ लाख रुपये जिल्हा बँकेकडून देणे आहे. जिल्हा बँक ह्या कामगारांचे पैसे गेले २०-१२ वर्षे बिन व्याजी वापरत आहे. ते परत मिळावेत म्हणून १ फेब्रुवारीपासून या कामगारांनी धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा मंगळवारी (दि. १४) ४२ वा दिवस आहे. मात्र या प्रकरणात आता विटा तहसीलदारांचे पत्र एक व्हायरल झाले आहे. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने यशवंत सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे हडपलेले ८ कोटी २८ लाख रुपये वसूल करण्यासाठी संबंधित अधिकारी आणि संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी करण्यात आली. साखर कामगार भाऊसो विष्णू यादव (रा.कडेपूर ता.कडेगाव जि.सांगली) यांनी ही मागणी केली आहे. त्यावर विट्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी हा विषय जिल्हा बँक आणि सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक यांच्या अंतर्गत असे सांगत हात वर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तहसीलदारांकडून न्याय मिळेल या आशेवर असले ल्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.