Vishalgad Encroachment
विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली हिंसाचार Pudhari File Photo
सांगली

Vishalgad Encroachment : विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली हिंसाचार

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा

विशाळगडावर शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी हिंसाचार केला. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकारने पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणे काढायला हवी होती. येथे हिंसाचार करणार्‍यांच्या पाठीशी जो कोणी असेल, त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. यावेळी राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, विशाळगडावरील घटना ही दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याक समाजाला कधीही अशी वागणूक दिली नव्हती. तेथील काही लोकांनी अतिक्रमण काढायला न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. उर्वरित लोकांची अतिक्रमणे शासनाने पावसाळा संपल्यानंतर काढायला हवी होती. गजापुरात जो हिंसाचार झाला, तो सच्चा शिवप्रेमींनी कधीच केला नसता. पोलिसांनीही यावेळी निष्काळजीपणा दाखवला. जादा पोलिस कुमक मागवली नाही.

ते म्हणाले, या घटनेमुळे उघड्यावर पडलेल्या लोकांचे शासनाने तातडीने पुनर्वसन करायला हवे. हिंसाचाराची ही घटना रोखता आली नाही, हे शासनाचे अपयश आहे. या घटनेच्या मागे जो कोणी असेल त्याच्यावर शासनाने तातडीने गुन्हा दाखल करायला हवा. या घटनेमुळे राज्यात अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण आहे.

मानसिंगराव नाईक आमच्यासोबतच...

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सर्व 12 मते जयंत पाटील यांनाच मिळाली आहेत. आमच्या पक्षाचे एकही मत फुटले नाही, असा निर्वाळा त्यांनी दिला. आमदार मानसिंगराव नाईक पक्षाशी एकनिष्ठ राहिलेत, असे ते म्हणाले. जयंत पाटील यांना त्यांनी गृहीत धरलेली मते मिळालेली नाहीत. काँग्रेसचीही त्यांना दुसर्‍या पसंतीची मते मिळाली नाहीत. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असेही त्यांनी सांगितले.

इंडिया आघाडी 170 जागा जिंकेल...

ते म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही आम्हाला चांगले यश मिळेल. सध्याचे वातावरण पाहता आम्हाला 170 ते 172 जागा मिळतील. विधानसभेचे जागावाटप तिन्ही पक्ष एकत्रित बसून निश्चित करतील.

काँग्रेस सोबत एकनिष्ठ असणार्‍यांची मते फुटल्याचे ऐकले

ते म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचीच काही मते फुटली. यामध्ये पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करणार्‍यांचेही नाव असल्याचे मी ऐकले आहे. या फुटीर आमदारांच्या बाबतीत काँग्रेस पक्ष आता काय भूमिका घेतो ते पाहावे लागेल. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

SCROLL FOR NEXT